‘तानी’, ‘रंगकर्मी’, ‘कॅम्पस कट्टा’ या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून संजीव कोलते यांची ओळख प्रेक्षकांना झाली असली तरी रंगभूमी, राज्य नाटय़ स्पर्धामधून अभिनय करण्यापासून आणि दूरदर्शन तसेच डीडी नॅशनल वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या सहभागाबरोबरच उपग्रह दूरचित्रवाहिन्यांच्या आगमनानंतरच्या काळात अनेकानेक मालिकांचे लेखन-दिग्दर्शन संजीव कोलते यांनी केले आहे. कला क्षेत्रातच काम करायचे ठरविल्यानंतर पत्नी सुवर्णा आणि कन्या गायत्री यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच आपण कारकीर्द घडवू शकलो, मनासारखे काम करू शकलो असे कोलते सांगतात. त्याचबरोबर श्रीहरी जोशी, मुरलीधर गोडे, विजय जोशी, अनंत जोग यांनी नेहमीच साथ दिली याबद्दलही कोलते कृतज्ञता व्यक्त करतात.
’माझी नाटकं-सिनेमा – ‘रंगकर्मी’, ‘तानी’, ‘अरूपाचे रूप’, मुंबईतील लोक ओळखायला लागला ‘पोहा चालला महादेवा’मधील भीम्या ही भूमिका
’आवडते मराठी चित्रपट – ‘सोंगाडय़ा’, ‘शेजारी’, ‘माणूस’, राजा परांजपे यांचे चित्रपट
’आवडते हिंदी चित्रपट – ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, बच्चनची ‘पा’
’आवडती नाटकं – ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘पोस्टर’, ‘वाडा चिरेबंदी’
’आवडते अभिनेते – अमिताभ बच्चन, निळू फुले, शरद तळवलकर, विक्रम गोखले, मोहन जोशी
’आवडत्या अभिनेत्री – स्मिता पाटील, सीमा देव, उषा नाईक, वीणा जामकर
’आवडते दिग्दर्शक – मदन गडकरी, विजया मेहता, विजय केंकरे, राजदत्त
’आवडते लेखक / नाटककार – चिं. त्र्यं. खानोलकर, बाळ कोल्हटकर, नबेंदू घोष,
’आवडलेल्या भूमिका – ‘पा’मधील बच्चनची भूमिका, ‘सामना’ निळू फुले यांची भूमिका, ‘उंबरठा आणि ‘भूमिका’मधील स्मिता पाटील यांची भूमिका, ‘साहब बीवी और गुलाम’मधील मीनाकुमारीची भूमिका
’आवडलेली पुस्तकं – शरदच्चंद्र चट्टोपाध्याय, जी. ए. कुलकर्णी, बंकिमचंद्र चटर्जी
’आवडते सहकलावंत – विक्रम गोखले, रमेश भाटकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अमोल कोल्हे
’आवडता खाद्यपदार्थ – उपमा
’ठाण्यातली आवडती ठिकाणं – कौपिनेश्वर मंदिर, उपवन तलाव, गायमुख येथील गोमुख, किल्ले मारुती मंदिराजवळचा तलाव
’आवडता फूडजॉइण्ट – राजमाता वडापाव
’आवडतं हॉटेल – राम मारुती रोडवरचे ‘शिवाप्रसाद’
’ठाण्याविषयी थोडेसे – मूळचा नागपूरचा असलो तरी जवळपास १९८१ सालापासून ठाण्यात यायचो. १९८७ साली ठाण्यात राहायला आलो आणि ठाणेकरच बनून गेलो. गडकरी रंगायतन येथेच माझ्या कला कारकीर्दीला समृद्ध सांस्कृतिकतेचे कोंदण लाभले, दिशा मिळाली हे नि:संशय. नागपूरला राज्य नाटय़ स्पर्धामध्ये अनेक नाटकांतून अभिनय केला, अनेक पारितोषिकेही मिळाली. परंतु, दिग्दर्शक व्हायचे मी मनोमन ठरविले. कुमार सोहोनी यांच्या ग्रुपमधील अनेक नाटकांतून काम केले. एकीकडे नाटकाच्या तालमी सुरू असतानाच डबिंगचे काम घ्यायला सुरुवात केली. ठाण्यातच कला क्षेत्रातील कामगिरीला अनेकविध पैलू मिळत गेले आणि ठाण्यातील लोकांनी मला खूप काही दिले आहे. जुने ठाणे खूप शांत आणि सांस्कृतिकदृष्टय़ा पूर्वीपासूनच कलावंतांना समृद्ध करणारे वातावरण लाभलेले आहे. अनेक दिग्गज कलावंताचे वास्तव्य, त्यांचा सहवासही मिळत गेला. सुरुवातीला करवालोनगर म्हणजे आताचे सावरकरनगर, नंतर वृंदावन सोसायटी, चरई अशा ठिकाणी राहिल्यानंतर आता कोरस नक्षत्र संकुलात वास्तव्य करतोय. बदलत गेलेले ठाणे मी जवळून पाहिले, अनुभवले आहे. ठाणे शहर हे माझ्या मनात विसावलेले शहर आहे. त्या अर्थाने मी अस्सल ठाणेकर आहे. मराठी संस्कृती ठाणेकरांनी नेहमीच जोपासली याचाही मला सार्थ अभिमान
आहे.
शब्दांकन : सुनील नांदगावकर