मराठी रंगभूमीला वेगळे परिमाण दिल्याने दिगंत कीर्ती मिळालेले ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक आता हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये रूपेरी पडद्यावर येत आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्रा. मधुकर तथा मामा तोरडमल यांनी स्वत:च ही घोषणा केली. लवकरच या चित्रपटाची निर्मिती सुरू होणार आहे.
तोरडमल यांचा ८३ वा वाढदिवस त्यांचे मुंबईतील मित्र आणि शिष्यांनी त्यांच्या समवेत नुकताच उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमातच मामांनी ‘तरुण तुर्क..’ च्या सिनेमाची घोषणा केली. सत्तरच्या दशकात आलेल्या या नाटकाचे जगभर तब्बल पाच हजार प्रयोग झाले. या नाटकाचे सिनेमात रूपांतर करण्यासाठी तोरडमल लक्ष घालणार असतील तर, नाटकाच्याच तोडीचा चित्रपट तयार होईल, यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली.