टेलिव्हिजन विश्वात एकेकाळी आपल्या खलनायिकी भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री तसनीम शेख आता पुन्हा छोट्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाली आहे. स्टार प्लस वाहिनीवर टीआरपीमध्ये अग्रेसर राहिलेल्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत मोहिनी या भूमिकेने प्रसिद्धीस आलेली तसनीम अनेक वर्ष स्टारडमपासून दूर राहिली. मात्र, तिच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अॅण्ड वाहिनीवरील एक विवाह ऐसा भी या मालिकेतून तसनीम छोट्या पडद्यावर पुनर्पदार्पण करत आहे.

img-20161221-wa0044

तसनीमने तिच्या मुलीला पूर्ण वेळ देण्यासाठी टेलिव्हिजनवरील कामाला ब्रेक दिला होता. एका संकेतस्थळाने छोट्या पडद्यावरील पुनर्पदार्पणाबद्दल तसनीमला विचारले असता ती म्हणाली की, मला काही मालिकांच्या ऑफर आल्या होत्या. पण, मी लागोपाठ त्या नाकारत गेले. मला माझ्या मुलीला पूर्ण वेळ द्यायचा होता. आता ती सात वर्षांची झाली आहे. मुलं ज्या वयात घडत असतात त्याचवेळी मला माझ्या मुलीला एकटं सोडायचं नव्हतं. माझं कुटुंब हे माझ्यासाठी नेहमीच सर्वात आधी येतं.

16

पुढे तसनीम म्हणाली की, माझी मुलगी आता ब-यापैकी मोठी झाली असून तिला माझ्या कामाबद्दल समजू लागले आहे. त्यामुळेच मी आता टेलिव्हिजनवर पुन्हा काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एक विवाह ऐसा भी मालिकेची कथा थोडी वेगळी आहे. या मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी मला अपेक्षा आहे. माझ्या आधीच्या मालिकांप्रमाणेच ते मला पुन्हा तसचं प्रेम देतील.