संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचविणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीत क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. मायकल इतका लोकप्रिय आहे, की त्याच्या इतका मोठा गायक-संगीतकार पाश्चात्य संगीत क्षेत्रात आजवर झालेला नाही असं म्हटले जाते. परंतु नुकत्याच झालेल्या ‘अमेरिकन म्युझिक अवॉर्ड’मध्ये २९ वर्षीय टेलर स्विफ्टने मूनवॉकर मायकला मागे टाकले आहे. तिने मायकलच्या नावे असलेल्या सर्वाधिक पुरस्काराच्या विक्रमावर स्वतःच नाव कोरलं आहे.

‘अमेरिकन म्युझिक अवॉर्ड’ हा पाश्चात्य संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारचे यंदाचे ४५वे वर्ष आहे. दरम्यान टेलर स्विफ्टने २०१९मधील सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तिला ‘यु नीड टू काम डाऊन’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला. तिने पटकावलेला हा २४वा AMA पुरस्कार होता. या पुरस्कारासह तिने मायकल जॅक्सनचा सर्वाधिक AMA पुरस्कार मिळवण्याचा विक्रम मोडला. याआधी मायकल जॅक्सनने २३वेळा हा पुरस्कार स्वतःच्या नावे केला होता. या नव्या विक्रमामुळे टेलर स्विफ्टची तुलना आता मायकल जॅक्सनशी होऊ लागली आहे.

“मला विश्वास बसत नाही माझ्या हातात २४वा MMA पुरस्कार आहे. हे सर्व मला स्वप्नवत वाटत आहे. माझा आजवरचा प्रवास खडतर होता. या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद” अशी प्रतिक्रिया टेलर स्विफ्टने पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली.