चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार त्या दिवशी प्रायोजकांनी नकार दिल्यामुळे हातपाय गळाले आणि आता सगळी तयारी झालेली असताना वेळेवर पैसे कुठून उभा करावे, असा प्रश्न निर्माण झाला, मात्र सहकाऱ्यांनी हिंमत आणि प्रोत्साहन दिल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती होऊ शकली. मोठे धाडस करून या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे चित्रपट निर्माती रूपाली कोंडेवार-बिरे यांनी सांगितले.
‘ते दोन दिवस’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माती रूपाली कोंडेवार-बिरे, कलावंत चिन्मय देशकर आणि प्रसिद्धी आयलवार यांनी लोकसत्ताला सदिच्छा भेट दिली. ‘ते दोन दिवस’ या नाटकावरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या नाटकाला राज्य नाटय़ स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळाली. विषय खूप चांगला असल्यामुळे त्यावर चित्रपट तयार करावा, असा विचार मनात आला आणि कामाला लागले. देवेंद्र बेलणकर, संजय वाढई आणि सोमेश्वर बालपांडे या सहकाऱ्यांनी हिंमत दाखवल्याने चित्रपटाच्या कामाला लागलो. या चित्रपटाकरिता आर्थिक बळ उभे करण्यासाठी आम्ही प्रायोजक  शोधले. नागपूर परिसरात २० दिवसांचे चित्रीकरण करण्याचे ठरले. नागपूरला चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्यामुळे मुंबईहून कॅमेरामन आणि सर्व कलावंत आले. सगळी तयारी झाली आणि ऐनवेळेवर प्रायोजकांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे एक क्षण काय करावे ते कळले नाही. पैसे भरपूर लागणार असल्यामुळे ते उभे कसे करायचे असा विचार मनात आला. मात्र, सर्व सहकाऱ्यांनी हिंमत दिली आणि कर्ज व सहकाऱ्यांची मदत घेऊन पैसे उभे केला. आज चित्रपट पूर्ण झाला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अल्का कुबल, अरुण नलावडे या कलावंतांसोबत नागपूरच्या अनेक कलावंतांना संधी देण्यात आली आहे. बालकलावंत चिन्मय देशकर आणि प्रसिद्धी आयलवार यांनी या चित्रपटात भूमिका केल्या असल्याचे रूपाली कोंडेवार-बिरे यांनी सांगितले.
चित्रपटाची निर्मिती झाल्यावर त्याच्या प्रमोशनसाठी भरपूर पैसे लागणार असल्यामुळे ते उभे केले जात आहेत. पहिलाच चित्रपट असल्यामुळे मोठी मेहनत घेतली. किमान लावण्यात आलेले पैसे निघावे अशी अपेक्षा आहे. यात आम्हाला यश येईल, असा आशावाद आहे. राज्यात सर्वच ठिकाणी प्रमोशनसाठी जात असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पैसे जमवण्यासाठी अडचणी असल्या तरी चित्रपटात कुठलीच कमतरता ठेवली नाही. मोहन जोशी, अल्का कुबल आणि अरुण नलावडे यांनी माझ्याकडे चित्रपटाची निर्मिती होईपर्यंत पैशाची मागणी केली नाही. सर्वच कलावंतांनी सहकार्य केल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती होऊ शकली. नागपूरच्या कलावंतांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, असा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण नागपूर आणि परिसरात करण्यात आले आहे. चित्रपटाची जाहिरात वेगवेगळ्या शहरात केली जात असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात या चित्रपटाचा पहिला प्रिमियर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटातील बाल कलावंत चिन्मय देशकर म्हणाला, या चित्रपटात मला भरपूर शिकायला मिळाले. नागपूरचा चित्रपट असल्यामुळे वेगळा आनंद आहे. चित्रीकरणाच्यावेळी माझी प्रकृती बरी नव्हती, मात्र मला सर्वच कलावंतांनी सांभाळून घेतले. चित्रीकरणाच्यावेळी खूप चांगले अनुभव आले.  प्रसिद्धी आयलवार म्हणाली, माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे मनात धास्ती होती. मात्र, सगळ्यांनी हिंमत दिल्याने चित्रपटात काम केले. चित्रपटासाठी चाचणी देताना त्रास झाला नाही. सुरुवातीपासून रंगमंचावर काम करीत असल्यामुळे चित्रपटात काम करताना त्रास झाला नाही. चित्रीकरणाचा अनुभव चांगला आहे. यापूर्वी मालिकांसाठी बोलावणे आले होते. मात्र, शिक्षण घेतल्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. हा पहिलाच चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.