अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले. बॉलिवूडमधल्या घराणेशाही, गटबाजीविरोधात तिने आवाज उठवला. टीम कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटद्वारे आता अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधण्यात आला आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरूनही टीम कंगना रणौतने ट्विट केलं आहे. ‘मुंबई पोलिसांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांच्यावर विश्वास नाही असं सुशांतचे कुटुंबीय म्हणत आहेत. त्याचसोबत नैराश्याचा व्यवसाय चालवणाऱ्यांनाही तुरुंगात टाकलं पाहिजे’, असं ट्विट टीम कंगना रणौतच्या अकाऊंटवर करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये दीपिकाला टॅग करण्यात आलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर दीपिकाने नैराश्यावरून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. दीपिकाने स्वत: नैराश्याचा सामना केला आहे. त्यामुळे सुशांतची मनस्थिती कशी होती हे मी समजू शकते असं तिने म्हटलं होतं.

आणखी वाचा : ‘जर सत्याची किंमत नसेल..’; सुशांतच्या बहिणीने केली न्यायाची मागणी 

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले असून पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केली.