News Flash

व्हिडिओः ‘हॅप्पी जर्नी’ म्हणजे तरल फँटसीपट

‘रेस्टॉरंट’, ‘गंध’ आणि ‘अय्या’सारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘हॅप्पी जर्नी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

| November 27, 2014 01:14 am

‘रेस्टॉरंट’, ‘गंध’ आणि ‘अय्या’सारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘हॅप्पी जर्नी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील चित्रपटांपेक्षा ‘हॅप्पी जर्नी’ हा अत्यंत वेगळा आणि मराठीत आतापर्यंत कोणीही हाताळलेला नाही असा तरल फँटसीपट असल्याचा दावा सचिन कुंडलकर यांनी केला. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आलेल्या ‘हॅप्पी जर्नी’च्या टीमने मराठी चित्रपटांच्या प्रवासातली एक वेगळी सुरुवात ठरणारा असा हा चित्रपट असेल, असे एकमुखाने सांगितले.

‘हॅप्पी जर्नी’ हा चित्रपट भावा-बहिणीच्या नात्यांवर आधारित आहे, असे सचिन कुंडलकर यांनी सांगितले. मानवी नात्यांचा वेध घेणे हा पहिल्यापासूनच आपल्या चित्रपटांचा विषय राहिला आहे. त्यातही शहरात वाढलेलो असल्याने तेथील सामाजिक गुंतागुंत आणि त्यातून निर्माण झालेला शहरी समाज, त्यांची मानसिकता याचे उत्खनन करायला आपल्याला नेहमी आवडते. ‘हॅप्पी जर्नी’मध्येही शहरी व्यक्तीच केंद्रबिंदू आहेत, अशी माहिती कुंडलकर यांनी दिली. ‘हॅप्पी जर्नी’ चित्रपटातील मुख्य कलाकार अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिद्धार्थ मेनन हे तिघेही कुंडलकर यांच्याबरोबर उपस्थित होते. या चित्रपटाची कथा वेगळी आहे, ती आजच्या बहीण-भावांची आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांचा लुकही अत्यंत वेगळा असल्याचे कुंडलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

घरात सगळ्यात जवळचे असलेले आणि तरीही दुर्लक्षित असलेले असे नाते म्हणजे भाऊ -बहिणीचे नाते म्हणता येईल. म्हणजे वय, काळ बदलत जातात तसा या नात्यातही बदल होत असतो. मात्र, आपण कायम हे नाते गृहीत धरलेले असते, असे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. ‘हॅप्पी जर्नी’मध्ये प्रगत समाजाचे प्रतिनिधित्व करणारे हे भाऊ-बहीण आहेत. मात्र, या नात्याची गोष्ट सांगताना त्यातला मित्रत्वाचा जो भाग आहे तोही अधोरेखित होतो, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या चित्रपटात अतुल कु लकर्णी आणि प्रिया बापट दोघेही ग्लॅमरस लुकमध्ये आहेत. अतुल पहिल्यांदाच इतक्या ग्लॅमरस लुकमध्ये दिसणार आहे. नेहमीच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या भूमिकेत राहिलेल्या अतुल कुलकर्णीला यावेळी त्यांच्या ठरावीक कामाच्या पद्धतीतून बाहेर काढून वेगळ्या पद्धतीने काम करायला लावल्याची माहितीही कुंडलकर यांनी यावेळी दिली. ‘हॅप्पी जर्नी’चा विषय हा व्यक्तीच्या अंतर्बाह्य़ स्थित्यंतराची गोष्ट सांगतो. एका प्रवासाच्या निमित्ताने प्रवासी असलेल्या दोन व्यक्तिरेखांचा बदलत गेलेले भावनिक आणि मानसिक आलेख हा ‘हॅप्पी जर्नी’चा मूळ गाभा आहे. त्याला तरल फँटसीचे आवरण आहे मात्र, या आवरणात अत्यंत वास्तवतेने मांडलेला आणि स्वप्नवत वाटावा असा एक विषय आहे, असे जाता जाता सूचक विधानही अतुल कु लकर्णी यांनी केले. या चित्रपटाच्या निमित्ताने एकूणच मराठी कलाकारांचा ग्लॅमर, स्टाईलकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मराठी चित्रपटांची सद्यस्थिती, कलाकार म्हणून अतुल कुलकर्णी, प्रिया आणि सिद्धार्थ यांची ‘हॅप्पी जर्नी’ यावर ‘रविवार वृत्तान्त’मध्ये सविस्तर वाचता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2014 1:14 am

Web Title: team of marathi movie happy journey in loksatta office
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 सतरंगी ससुराल ३ डिसेंबरपासून झी वाहिनीवर
2 हिंदी विनोदी मालिकांमध्ये कमरेखालचे विनोद असणे स्वाभाविकच – अतुल परचुरे
3 अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा
Just Now!
X