टेलिव्हिनजवर नुकताच सुरू झालेल्या ‘टेड टॉक्स इंडिया नयी सोच’ या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या लोकांना आमंत्रित केले जाते. हे लोक प्रेक्षकांसमोर त्यांचे अनुभव सांगतात. अवघ्या ४५ मिनिटांच्या या कार्यक्रमात अनेक गोष्टी दाखवण्याच्या दिग्दर्शकाच्या प्रयत्नामुळे बराच गोंधळ उडताना पाहायला मिळतो. अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर भरभर येतात. याशिवाय, सूत्रधार असलेला शाहरूख फार कमी वेळ स्क्रीनवर दिसत असल्याने प्रेक्षकांची हिरमोडही होत आहे. त्यामुळे ‘टेड टॉक्स इंडिया नयी सोच’ला अजून तितकीशी लोकप्रियता लाभलेली नाही.

सध्या या कार्यक्रमातील एक प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे. ‘टेड टॉक्स’च्या आगामी भागात गुरमेहर कौर ही प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. गुरमेहरचे वडील भारतीय सैन्यात होते. देशाची सेवा करत असताना त्यांना वीरमरण आले होते. या भागात गुरमेहने आपल्या लहानपणीचे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. वडील गेल्यानंतर आपले आयुष्य कशाप्रकारे बदलले, याबद्दल ती बोलली. तसेच आयुष्यात आपल्याला शब्दांचे सामर्थ्य कशाप्रकारे उमगले, हे तिने प्रेक्षकांना सांगितले.

वाचा : अनुष्का शर्माच्या भावाला लग्नाचे आमंत्रणच नव्हते!

महाविद्यालयीन जीवनात आपल्याला समता आणि शांततेचा विचार मांडण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागला. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीच्या काळात आपल्याला कशाप्रकारे धाक दाखवण्याचा प्रयत्न झाला, तिच्याच वयाच्या लोकांकडून कशाप्रकारे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या, हे सर्व अनुभव तिने प्रेक्षकांसमोर मांडले. मात्र, या सगळ्यामुळे मोडून न पडता चळवळीतून बाहेर पडण्याच्या निर्णयापासून परावृत्त झाल्याचेही गुरमेहरने सांगितले. यावेळी शाहरूख खान प्रेक्षकांमध्ये बसून तिचे भाषण ऐकत होता. तिचा हा संघर्ष ऐकून शाहरूखच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. यावेळी शाहरूख खूप भावूक झाला होता. आपल्या आयुष्यातील भीती आणि निर्णयक्षमतेची परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगाबद्दल गुरमेहर ज्याप्रकारे खुलून बोलली त्याचे शाहरूखने कौतुक केले. तसेच शाहरूखने भावी आयुष्यासाठी गुरमेहरला शुभेच्छाही दिल्या.