बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सध्या महिला प्रधान चित्रपटांना प्राधान्य देताना दिसत आहे. येत्या काळात तिचा आणखी एक महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘तेजस’ असे आहे. या चित्रपटामध्ये कंगना भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. या पोस्टरमध्ये कंगना फायटर वैमानिकाच्या पोशाखात दिसत आहे. ‘तेजस’चे दिग्दर्शन प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सर्वेश मेवरा करत आहेत. तर निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला यांनी स्विकारली आहे.

तेजसबाबत काय म्हणाली कंगना?

“गेल्या अनेक वर्षांपासून मला भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट अद्याप माझ्या वाट्याला आलेला नव्हता. परंतु ‘तेजस’ या चित्रपटामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही या चित्रपटावर जीव तोडून मेहनत करतोय. आणि पंगा या चित्रपटाप्रमाणे तुम्हाला तेजस देखील आवडेल अशी मला खात्री आहे.” असे म्हणत कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘तेसज’ येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.