कोणतेही नियम आणि वेळापत्रक केले तरी त्यामुळे कलाकारांच्या अनारोग्याचा प्रश्न कायमचा सुटणार नाही. त्यासाठी कलाकारांनी स्वत:वरच काही नैतिक बंधने घालून घेणे आवश्यक आहे, असा सूर कलाकारांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत मनोरंजन सृष्टीतून व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही गोष्टीत, नशेत किती वाहावत जायचे, त्याची मर्यादा त्यांनी आखून घेणे गरजेचे आहे. कारण ‘शीर सलामत तो पगडी पचास’ हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. मोहमयी आणि झगमगाटाच्या या दुनियेत अनेक प्रलोभने कलाकारांच्या समोर येत असतात आणि येत राहणारच.
पण त्यासाठी स्वत:च्या आरोग्याची, कुटुंबीयांची आणि जिवाचीही किंमत चुकवावी लागत असेल तर त्यात किती बुडायचे आणि वाहावत जायचे, याचा प्रत्येक कलाकाराने स्वत:च्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करावा, असे मत गेली अनेक वर्षे या क्षेत्रात वावरणाऱ्या एका बुजुर्ग अभिनेत्याने व्यक्त केले.
प्रत्येकाने सदसद्विवेक जागृत ठेवला तर या आव्हानांना सहजपणे सामोरे जाता येईल. नव्हे याच नाटक, चित्रपट आणि मालिका सृष्टीतील काही कलाकारांनी तसे वागून एक आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. या कलाकारांच्या पावलावर केवळ नुसते पाऊल जरी ठेवले तरी हे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास या बुजुर्ग कलाकारांकडून व्यक्त करण्यात आला.
मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली की ‘अध्र्या हळकुंडाने पिवळ्या’ झालेल्या या कलाकारांचे स्वत:चे वर्तनही त्यांच्या ऱ्हासास, अनारोग्यास कारणीभूत ठरते आहे.
रंगभूमीवरील गुणवंत आणि कसदार अभिनयासाठी ओळखले जाणारे काही कलाकार दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांना आयुष्यातून आणि रंगभूमीवरूनही कशी अकाली ‘एक्झिट’घ्यावी लागली याची उदाहरणे समोर असतानाही नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर ‘तिसरा अंक’ हमखास रंगतो.
प्रसिद्धीच्या नशेबरोबरच ही नशाही सुरू होते आणि कुठे व किती या मर्यादेचे भान न राहिल्याने कलाकारांचा ताळतंत्र सुटतो, ते व्यसनांच्या आहारी जातात, असे एका मालिका निर्मिती संस्थेच्या प्रमुखाकडून सांगण्यात आले.
चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील प्रसिद्धीमुळे कलाकार मंडळी घराघरात पोहोचतात. एकदा का नाव मिळाले की त्या कलाकाराचाही ‘भाव’ वाढतो. यातूनच मग नवरात्र, दहीहंडी किंवा कोणत्याही कार्यक्रमात, कुठेही आणि कधीही ही मंडळी ‘सुपाऱ्या’ घेऊन स्वत:ला प्रदर्शित करतात.
मग त्यासाठी वेळीअवेळी प्रवास, विश्रांती न घेता पायाला भिंगरी लावल्यासारखे सतत फिरणे, जास्तीत जास्त ‘सुपाऱ्या’पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणे, चित्रीकरण संपल्यानंतरही थेट घरी न जाता वाट वाकडी करून कुठेतरी ‘बसणे’, मजा म्हणून किंवा कामाचा ताण विसरण्यासाठी काही वेळेस अमली पदार्थाचे सेवन करणे कलाकारांच्या विशेषत: तरुण कलाकारांच्या बाबतीत नित्याचे झाले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुण्यासारख्या ठिकाणी भर वस्तीत काही तरुण कलाकारांचा ‘तोल’ सुटणे, एका ज्येष्ठ  अभिनेत्याने धाब्यावर दारू पिऊन गोंधळ घालणे, असे प्रकार घडल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.