कमोनिकाच्या मोठय़ा टिकल्या असो वा पार्वतीच्या साडय़ा.. एकता कपूरच्या ‘क’च्या बाराखडीतील मालिकांना सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत तिच्या मालिकांमधील पात्रांनीच नाही, तर त्यांच्या कपडय़ांनीही महिला प्रेक्षकवर्गाला भुरळ घातली आहे. मालिकांच्या नायिकांचे कपडे आपल्या कपाटातपण सजावेत अशी इच्छा भारतातील कित्येक महिलांची आहे. हीच बाब हेरून निर्माती एकता कपूरने ‘एके’ हा नवा साडय़ांचा ब्रॅण्ड आणला असून, त्यामध्ये सध्या मालिकेत गाजत असलेल्या नायिकांच्या साडय़ा ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
‘क्युं की साँस भी बहू थी’पासून एकता कपूरच्या प्रत्येक मालिकेतील पात्रांच्या पेहरावाची चर्चा महिलावर्गात होण्यास सुरुवात झाली. बाजारातसुद्धा या नायिकांनी मालिकेत घातलेल्या साडय़ांच्या बनावट प्रतीही पाहायला मिळतात. ‘आपणही या नायिकांप्रमाणे आकर्षक दिसावे,’ ही महिलावर्गाची मागणी लक्षात घेऊन एकता कपूरने साडय़ांचा ब्रॅण्ड बाजारात आणला असून, त्यामध्ये ‘बालाजी टेलिफ्लिम्स’च्या आघाडीच्या नायिकांच्या साडय़ा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ‘ये है महोबत्ते’, ‘कुमकुमभाग्य’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सध्या गाजत असलेल्या मालिकांच्या नायिकांच्या साडय़ांचा समावेश होणार आहे. या निमित्ताने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भारतातील कानाकोपऱ्यातील महिलांपर्यंत आपल्या कलेक्शनच्या माध्यमातून पोहचण्याची आपली इच्छा व्यक्त केली. एकताने आतापर्यंतच्या आपल्या प्रत्येक मालिकेतील मुख्य पात्रांच्या पेहरावाकडे जातीने लक्ष दिले आहे. पण त्या सर्वामध्ये आपल्याला ‘कहानी घर घर की’च्या पार्वतीच्या छापातून साक्षी तन्वरला बाहेर काढून तिला ‘बडे अच्छे लगते है’मधील प्रियाचा लुक देण्यात जास्त कष्ट पडल्याचे तिने सांगितले. कारण या मालिकेसाठी तिला साक्षीला तिच्या वयापेक्षा जास्त दाखवायचे होते, पण वृद्ध दाखवायचे नव्हते, हे आपल्यासाठी मोठे आव्हान असल्याचे सांगितले.
 मॉलमधील दुकानांच्या भाडय़ामुळे कपडय़ांची वाढणारी किंमत हा मुद्दा ध्यानात घेऊन एकताने तिचे कलेक्शन वेबसाइट आणि होम शॉपिंग वाहिनीच्या माध्यमातून ग्राहकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
पण तरीही, सेलेब्रिटीजच्या साडय़ा म्हणून त्यांची किंमत सामान्यांच्या अवाक्याच्या बाहेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या साडय़ा किमती आणि त्या सामान्य महिलांना कितपत परवडू शकतात, हे मात्र १८ तारखेला ब्रॅण्ड बाजारात आल्यावरच ग्राहकांना कळू शकेल.
मालिकांमधील नायिकांच्या साडय़ांचा महिलावर्गावर मोठा पगडा आहे. त्यामुळे या प्रेक्षकवर्गाला त्यांच्या आवडत्या नायिकांच्या साडय़ा उपलब्ध करून देणे हे माझे उद्दिष्ट होते. या ब्रॅण्डच्या माध्यमातून खिशाला परवडणाऱ्या पण स्टायलिश आणि ग्लॅमरस साडय़ांचे केलक्शन ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.    -एकता कपूर