टेलिव्हिजन विश्वातील ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री, मॉडेल अनुषा दांडेकर यांच्या नात्यात सध्या ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे कळत आहे. सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगमुळे करण आणि अनुषाच्या नात्यात काही अडचणी निर्माण झाल्याचे खुद्द करणनेच स्पष्ट केले आहे.

काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोशल मीडिया ट्रोलिंगचा आपल्या नात्यावर झालेल्या परिणामाविषयी सांगताना करण म्हणाला, ‘काही बाबतीत मी स्वत:ला यासाठी कारणीभूत ठरवतो. कारण, ट्रोलिंगचा सामना तिला (अनुषाला) रोज करावा लागतो. ज्यामुळे आमच्या नात्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे फक्त अनुषा आणि माझ्या नात्यातच नव्हे तर, माझ्या घरीही तणावाचे वातावरण आहे. माझ्या आईनेही यावर आता व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे’, असे करणने सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे अनुषा आणि करण येत्या काळाच ‘एमटीव्ही ट्रोल पोलीस’ या कार्यक्रमातून एकत्र झळकणार आहेत. ज्यामध्ये त्यांना इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर खिल्ली उडवणाऱ्या एका युजरचा सामना करावा लागणार आहे. सोशल मीडियावर आपल्याविषयी होणाऱ्या ट्रोलिंगचा करणसोबतच्या नात्यावर झालेल्या परिणामांविषयी अनुषा म्हणाली, ‘गेल्या काही काळापासून ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. करण आणि मी एकमेकांना डेट करु लागल्यापासून माझे आयुष्यच बदलून गेले. रोज सकाळी उठल्यानंतर जवळपास ५० लोकांच्या घृणास्पद प्रतिक्रिया, कमेंट्स वाचणे हे फारच कठीण आहे.’

वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

हिंदी भाषेवर आपले प्रभुत्व नसल्यामुळे त्यातील हिंदी कमेंट्स तर आपल्याला कळतही नसल्याचे तिने स्पष्ट केले. पण, सोशल मीडिया ट्रोलिंगच्या माध्यमातून आपल्यावर निशाणा साधणाऱ्यांना करणसोबच्या तिच्या नात्यात दुरावा यावा अशीच इच्छा असल्याचेही तिने स्पष्ट केले. ‘आमचा ब्रेकअप व्हावा अशीच काहीजणांची (ट्रोलर्सची) इच्छा आहे. कारण त्यांना क्रितीका (करणची पूर्वाश्रमची प्रेयसी) जास्त आवडते. त्या दोघांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमात कामही केले होते. मुळात ती प्रेक्षकांची आवडती जोडी होती’, असे अनुषा म्हणाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी झाली. किंबहुना चाहते आणि कलारांचे नाते आणखीनच दृढ झाले. पण, काही बाबतीत मात्र चाहते आणि निंदकांच्या या सोशल वर्तुळात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यावर मात्र चुकीचे परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.