News Flash

पारदर्शकतेकडे वाटचाल..

आटपाट नगर होतं. तिथे मनोरंजनाच्या विविध साधनांची रेलचेल होती.

|| भक्ती परब

२०१९ हे नवं वर्ष सुरू झाल्यापासून बार्कने दर आठवडय़ाला नेहमीप्रमाणे टीआरपी जाहीर करत ६ फेब्रुवारीला पाचव्या आठवडय़ाचा टीआरपी सार्वजनिकरीत्या जाहीर केला. त्यानंतर टीआरपी सार्वजनिक करणं बंद केलं. याचं कारण दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) वाहिन्या निवडीचं स्वातंत्र्य देणारा नवा नियम होता. पण नंतर ट्रायनेच खडसावल्यावर १३ व्या आठवडय़ापासून बार्कने पुन्हा टीआरपी सार्वजनिक करणं सुरू केलं. तोवर प्रेक्षकांमध्ये आणि जाहिरातदारांमध्ये संभ्रम होता, आताही आहे. यामुळे सशुल्क वाहिन्या आणि नि:शुल्क वाहिन्या यांच्यात टीआरपीमध्ये कोण वरचढ ठरतंय, अशी स्पर्धा सुरू झाली आहे.

आटपाट नगर होतं. तिथे मनोरंजनाच्या विविध साधनांची रेलचेल होती. ग्राहकराजा (प्रेक्षक) नाटक, चित्रपट, मालिकांनंतर वेबसीरिज या माध्यमाकडे ओढला जात होता. दूरचित्रवाणी संचावर ९०० च्या आसपास पोहोचलेल्या वाहिन्यांवर नवे कार्यक्रम पाहायला मिळत होते. परंतु अचानक या मनोरंजनात मिठाचा खडा पडला. नववर्षांची सकाळ छोटय़ा पडद्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी नव्या बदलाची नांदी घेऊ न आली. ग्राहकराजाला वाहिन्या निवडीचा अधिकार मिळाला, परंतु ग्राहकराजा खूश होण्याचं काही चिन्ह दिसेना. सरसकट वाहिन्या पाहण्याची सवय सुटता सुटेना. ग्राहकांपर्यंत आपल्या वाहिनीचे पॅकेज पोहोचवण्यासाठी खुद्द शहेनशहा अमिताभपासून आमीर खानपर्यंत साऱ्या नावाजलेल्या अभिनेत्यांनी प्रेक्षकांना प्रेमाने पॅकेज निवडा असं सांगून झालं. त्याचा फरक पडेना म्हटल्यावर ग्राहकांनी आपल्या वाहिनीसमूहाचा पॅक न घेता, इतर कुठल्या वाहिनीसमूहाचा पॅक घेतला असेल तर ग्राहकांना साद कशी घालायची?, यासाठी मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांपासून ते वरुण धवन, आलिया भट सगळ्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी सांगितलं पॅक कुठलाही असूद्यात, तरीही तुम्ही त्याच्या जोडीने तुमची आवडीची एखादी वाहिनी निवडू शकता. इतकं सगळं असूनही ग्राहकांच्या आवडत्या यादीत आपण नसलो तर काय?, ही भीती अजूनही मोठमोठय़ा समूहांना सतावते आहे. त्याला एकाअर्थी बाक्रने जाहीर केलेले टीआरपीचे आकडेही कारणीभूत ठरले आहेत.

१ फेब्रुवारीपासून वाहिन्या निवडीच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर काही मोजक्याच वाहिन्या सशुल्क असलेल्या नि:शुल्क झाल्या आणि काही नि:शुल्कअसलेल्या वाहिन्या सशुल्क झाल्या. कारण एकाच पॅकेजमध्ये सशुल्क आणि नि:शुल्क वाहिन्या ग्राहकांना विकता येणार नाहीत, असा नियम आहे. त्यामुळे वाहिनी एक तर सशुल्क ठेवा किंवा नि:शुल्क ठेवा असं ट्रायकडून प्रक्षेपण कंपन्यांना सांगण्यात आलं. त्यानुसार स्टार, कलर्स, झी आणि सोनी या प्रक्षेपण कंपन्यांना त्यांच्या सर्व वाहिन्यांची विक्री करताना पॅकेजेस बनवावी लागली. हे पॅकेजेस निवडीचं प्रकरण प्रेक्षक, केबल ऑपरेटर्स यांना सवयीचं होईस्तोवर मध्यंतरीच्या काळात डी डी नॅशनल, डी डी न्यूज, दंगल टीव्ही, बिग मॅजिक सारख्या नि:शुल्क वाहिन्यांना प्रभावी प्रेक्षकसंख्या मिळाली. आताही ज्यांनी पॅकेजेस निवडलेली नाहीत किंवा अगदी प्राथमिक-स्वस्त पॅकेजेस निवडली आहेत त्यांच्याकडे सशुल्क वाहिन्यांचं प्रमाण मोजकंच आहे. परिणामी सशुल्क वाहिन्यांसमोर नि:शुल्क वाहिन्यांचं आव्हान उभं राहिलं आहे. याविषयी कलर्स हिंदी, वाहिनीप्रमुख, नीना जयपुरीया म्हणाल्या, ट्रायच्या नव्या नियमामुळे दूरचित्रवाणी क्षेत्रात पारदर्शकता येईल. हा नवा नियम प्रेक्षकांसाठी फायद्याचा आहे. सध्याचं सशुल्क विरुद्ध नि:शुल्क वाहिन्या हे चित्र येत्या दोन-तीन महिन्यांत निवळेल. कुठलाही नवीन नियम येतो तेव्हा त्याच्या अंमलबजावणीसाठी काही कालावधी लागतो. आम्ही मात्र नवनवीन कार्यक्रम, रिअ‍ॅलिटी शोज घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा वसा सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

एका कंपनीच्या अवहवालानुसार गेल्या दोन-तीन महिन्यांत ४००च्या आसपास जाहिरातदारांनी छोटय़ा पडद्याला जाहिराती देणं बंद केलं असून ऑनलाइन मनोरंजनाकडे त्या जाहिराती वळवल्या आहेत. तसंच इंग्रजी मनोरंजन वाहिन्या, काही वाहिनीसमूहांच्या एकेकटय़ा सशुल्क वाहिन्या पॅकेजमध्ये देता येत नसल्यामुळे त्यांनी गेल्या वर्षांच्या तुलनेत सरासरी प्रेक्षकसंख्या गमावली आहे. ‘स्टार भारत’ ही वाहिनी बंद होणार असं बोललं जातंय आणि वाहिनीची कार्यक्रम आखणीची धोरणं बदलणार असंही बोललं जातंय. दुसरीकडे आनंद महिंद्रा यांची मालकी असलेल्या ‘एपिक’ वाहिनीच्या बरोबरीने त्यांनी आणखी दोन वाहिन्या आणण्याचं जाहीर केलं आहे. गेल्याच महिन्यात अजून एका प्रसिद्ध वाहिनीसमूहाने ११ नव्या वाहिन्यांची मंजुरी मिळवली आहे. तसंच इतर दोन वाहिनीसमूहांनी प्रत्येकी एकेक नवीन वाहिनीची मंजुरी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून (मिनिस्ट्री ऑफ इन्फॉरमेशन ब्रॉडकास्टिंग) मिळवली, अशीही माहिती मिळते आहे.

या बदलावर मत मांडताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, सध्या आम्ही फक्त या बदलाचं निरीक्षण करत आहोत. हा बदल सगळ्याच वाहिन्यांसाठी नवीन आहे. त्यामुळे आता त्यावर बोलणं म्हणजे घाई केल्यासारखं होईल. त्यामुळे बदलाचं निरीक्षण करण्यापलीकडे काही करू शकत नाही. वाहिन्या निवडीचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजूनही काही ठिकाणी जुन्या नियमाप्रमाणेच कारभार सुरू आहे. यावर प्रेक्षकांनी सजग होऊन काही वेळ काढून वाहिन्यांची निवड करण्याची आवश्यकता असल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. बार्कने ९०० वाहिन्यांमधून प्रेक्षक फक्त ३० ते ३५ वाहिन्या पाहतात, अशी एक आकडेवारी सांगितली होती. त्याप्रमाणे प्रेक्षकांनी सरसकट वाहिन्या न निवडता झी, कलर्स, सोनी आणि स्टार यांपैकी दोन किंवा तीन पॅक निवडून एक पर्याय ठेवला, तरी निवडीमध्ये पारदर्शकता येऊ  शकेल. सरसकट वाहिन्या पाहणं ही जुनी सवय ग्राहकांनी मोडायला हवी. याचं कारण आपण पाहत नसताना एखादी वाहिनी निवडली तर त्या वाहिनीला प्रेक्षकसंख्येच्या आधारे जाहिराती मिळतात, त्या त्यापुढेही तशाच सुरूच राहतील. पण चांगली आशयनिर्मिती मात्र होणार नाही.

याचा फटका चांगली आशयनिर्मिती करणाऱ्या वाहिन्यांना बसू शकतो, जसा तो आता बसतो आहे. दंगल टीव्ही, बिग मॅजिक, फक्त मराठी या वाहिन्या नि:शुल्क आहेत आणि त्यावर जुन्याच मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येतात. या वाहिन्या तशाच पाहणं सुरू ठेवलं तर इतर चांगला आशय देणाऱ्या वाहिन्यांची जागा कायमस्वरूपी याच वाहिन्या पुढे घेताना दिसतील. हे टाळायचं असल्यास वाहिन्यांचा एकाला दुसरा असा असलेला पर्याय निवडायला हवा, त्यामुळे या व्यवहारात पारदर्शकता येईल, असं या क्षेत्रातील धुरिणांचं म्हणणं आहे.

ज्या सशुल्क वाहिन्या सातत्याने प्रेक्षकांसाठी नवे नवे प्रयोग करून विविधांगी आशय देत आहेत, त्यांची निवड प्रेक्षकांनी केली पाहिजे. ट्रायच्या निर्णयामुळे झालेल्या बदलातून सशुल्क वाहिन्यांकडून कसा मार्ग काढला जाणार आहे, हे येत्या काही महिन्यांत दिसेल. कारण फेब्रुवारीपासून नियम लागू झाल्यावरही सातत्याने हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांमध्ये नवे कार्यक्रम येण्याचे प्रमाण थांबलेलं नाही. याविषयी ‘कलर्स मराठी’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ट्रायच्या निर्णयामुळे छोटा पडदा एका मोठय़ा बदलातून जातो आहे. त्याचा फायदा प्रेक्षकांना होणार आहे आणि वाहिन्यांनासुद्धा होणार आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये ‘कलर्स मराठी’ वाहिनीपुरतं बोलायचं झालं तर आम्ही हा निर्णय लागू झाल्यापासून इतर वाहिन्यांच्या तुलनेत स्थिर राहिलो आहोत. तसंच काही प्रमाणात प्रेक्षकसंख्येची वाढही दिसून आली आहे. दैनंदिन मालिका आणि कथाबह्य मालिका यांचा सुरेख मेळ आम्ही घातला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’सारख्या शोने चालकाची भूमिका बजावली आहे. त्याचाही फायदा होतो आहे. ‘महाराष्ट्र जागते रहो’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘बिग बॉस’, ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ हे कार्यक्रम आणून चांगला प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही केला. यापुढेही कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना चांगला आशय देण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत, असं साने म्हणाले.

तर काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी ट्रायच्या निर्णयामुळे कोणताच गोंधळ नसून सारं काही नेहमीप्रमाणेच सुरळीत असल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. एकंदरीत प्रेक्षक जितक्या लवकर त्यांना आवडणाऱ्या पर्यायी वाहिन्या निवडतील तितक्या लवकर सध्या सुरू असलेला सशुल्क वाहिन्या विरुद्ध नि:शुल्क वाहिन्या हा तिढा सुटू शकेल. तसंच ज्या वाहिन्या चांगली आशयनिर्मिती करतात त्यांच्याकडे प्रभावी प्रेक्षकसंख्या राखली जाईल. हा पारदर्शीपणा अनुभवण्यासाठी ग्राहकांनी स्वत:हून वाहिन्या निवडीमध्ये सहभाग घ्यायला हवा. तेव्हाच आटपाट नगरातील ग्राहकराजाला दर्जेदार आशय छोटय़ा पडद्यावर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2019 12:09 am

Web Title: television audience measurement india
Next Stories
1 ‘मसालापटांचा जमाना गेला..’
2 बोलीभाषेची फोडणी
3 ‘काजव्यांचा गाव’ कोकणातलं ‘वाडा’
Just Now!
X