टेलिव्हिजन विश्वातील बऱ्याच कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली की मालिका चित्रपटांपेक्षाही जास्त लोकप्रिय ठरल्या. रोजच्या आयुष्यातील काही प्रसंग, सासू- सुनांमध्ये होणारे वाद, त्यांच्यात उडणारे खटके या सर्व गोष्टींचा आधार घेत बऱ्याच मालिकांची कथानकं आजवर उभी करण्यात आली. त्यातही प्रेक्षकांची आवड पाहता काही मालिका निर्माते आणि दिग्दर्शकांनी याच कौटुंबिक विषयांच्या आधारे टीआरपी मिळवला. अशा काही मालिकांमधूनच मुख्य कलाकारांपेक्षाही ‘सासू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी अनेकांची मनं जिंकली. मुख्य भूमिकेत नसतानाही आपल्याला मिळालेली भूमिका चोखपणे बजावत काही अभिनेत्रींनी ‘सासू’ची व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे उभी केली. चला तर मग, टेलिव्हिजन विश्वातील अशा या ठसकेबाज सासू आहेत तरी कोण…

‘बा बहू और बेबी’ या मालिकेत ‘बा’च्या भूमिकेत झळकलेल्या सरिता जोशी आजही अनेकांच्या आवडीच्या आहेत. आपल्या सुनांना पावलोपावली पाठिंबा देणाऱ्या सासूची भूमिका त्यांनी सुरेखपणे बजावली होती.

कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेने बरीच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेत अभिनेत्री स्मिता बन्सलने साकारलेली सालस आणि समजुतदार सासूची भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली होती.

‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत दलजीत सौंध यांनी साकारलेली ‘दादी सास’ ही भूमिका गाजण्यामागचं कारण म्हणजे दलजीत यांचा सुरेख अभिनय.

‘बालिका वधू’ या मालिकेला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमागे असणारं आणखी एक कारण म्हणजे ‘दादीसा’. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी या मालिकेत ‘दादीसा’ ही भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ‘कल्याणी देवी’ची भूमिका मालिकेत विशेष आकर्षणाचा विषय ठरली होती.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हणजे टेलिव्हिजन विश्वातील एक मैलाचा दगड असंच म्हणावं लागेल. या मालिकेतील ‘बा’लासुद्धा कोणीही विसरलेलं नाहीये.

अस्सल गुजराती कुटुंबामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडींवर आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारी आणखी एक मालिका म्हणजे ‘साथ निभाना साथिया’. या मालिकेतील बरीच पात्र चर्चेत आली होती. पण, त्यातही नावाजलं गेली ती म्हणजे स्वाती शाह यांनी साकारलेली ‘हेतल मोदीं’ची भूमिका.

टीआरपी रेटिंगमध्ये बराच काळ आघाडीवर राहिलेल्या ‘दिया और बाती हम’ या मालिकेत ‘सूरज- संध्या’च्या केमिस्ट्रीसोबतच ‘भाभो’ची भूमिकाही गाजली. ‘संध्या बिंदणी…’ अशी हाक मारणारी भाभो शिस्तप्रिय आणि संस्कारप्रिय सासू म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.