कलाविश्वात एखाद्या कलाकाराच्या वाट्याला प्रसिद्धी येते तर ही परिस्थिती बदलण्यास फार वेळ लागत नाही. सध्या अशाच परिस्थितीचा सामना टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जया भट्टाचार्यला करावा लागत आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहूँ थी’ या मालिकेत ‘पायल’ आणि ‘झाँसी की रानी’ या मालिकेत ‘सखुबाई’ची भूमिका साकारणाऱ्या जयाच्या वाट्याला बऱ्याच भूमिका आल्या आणि त्यांनी त्या तितक्याच ताकदीने निभावल्याही. पण, आता मात्र तिच्याकडे कामासाठी इतरांकडे आर्जव करण्याची वेळ आली आहे.

सध्याच्या काळात जयाकडे कोणतेच काम नसून कारकिर्दीच्या कठिण प्रसंगातून त्यांना जावे लागते आहे. ‘टेलिचक्कर’शी बोलताना जयाने आपल्या या परिस्थिती विषयी सर्वांना माहिती दिली. ४६ वर्षीय जया तिच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण, आता मात्र कलाविश्वानेच तिच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या वयामुळे आईची बिघडणारी प्रकृती आणि घराचे सुरु असणारे काम या साऱ्यामुळे जयाला बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

जयाच्या आईला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हृदयरोगामुळे त्रस्त असलेल्या आपल्या आईच्या उपचारासाठीही जयाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविषयीच ‘टेलिचक्कर’ या वेबसाइटशी बोलताना जया म्हणाली, ‘२६ नोव्हेंबरला माझ्या आईला रुग्णालयात दाखल केल्यापासून मी बऱ्याच अडचणींचा सामना करतेय. घरात सुरु असणाऱ्या नुतनीकरणाच्या कामामुळे सध्या मी मानलेल्या भावासोबत राहते. निर्णयस्वातंत्र्य आणि काम करण्याची मोकळीक असली, तरी मी कोणावर अवलंबून राहू शकेन अशी व्यक्ती माझ्याजवळ नाही. मला आधार देण्यासाठी कोणीच नाही, याची मला खंत नाही. कारण, मी एक खंबीर महिला असून, परिस्थितीसमोर मी कधीच शरणागती पत्करणार नाही.’ परिस्थिती जयाला नमवू शकली नसली तरी यातून सावरण्यासाठी तिला कामाची गरज आहे. तिची आर्जव कोणी ऐकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.