लॉकडाउनच्या काळात घरात बसून आता प्रत्येक जण कंटाळला आहे. या काळात टीव्हीवरील मालिका हेच आता जनतेच्या विरंगुळ्याचं साधन झालं आहे. त्यातही चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे टीव्हीवर सुद्धा नवीन काही खास पाहायला मिळत नाहीये. त्यामुळेच ‘रामायण’ ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. विशेष म्हणजे पुन्हा एकदा सुरु झालेल्या या मालिकेने एका दिवसात विश्वविक्रम केला आहे.

८०-९० च्या दशकातील ‘रामायण’ ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये ती तुफान लोकप्रिय झाली आहे. केवळ ही मालिकाच नव्हे, तर मालिकेतील कलाकारदेखील तितकेच चर्चिले जात आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पाहायला गेलं तर ‘रामायण’ याच मालिकेची चर्चा दिसते. यामध्ये सध्या नवीन चर्चा रंगली आहे ती मालिकेने केलेल्या विश्वविक्रमाची. या मालिकेने एका दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळवले आहेत.

प्रसारभारतीच्या ट्विटर पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यांनी रामायण या मालिकेला १ दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळाल्याचं म्हटलं आहे सोबतच हा विश्वविक्रम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. १६ एप्रिल रोजी या मालिकेला ७.७ कोटी व्ह्युज मिळाले.

प्रसार भारतीच्या सीईओंनी देखील पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ”२०१५ पासून आतापर्यंत मालिका विभागामध्ये रामायण प्रथम स्थानावर आहे. २०१५ ते २०२० या काळात रामायणला सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे”, अशी पोस्ट प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी केली आहे.

दरम्यान, लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने ‘रामायण’ ही मालिका पुन्हा सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मालिकेसोबतच ९० च्या दशकातील अन्य मालिकाही सुरु करण्याची मागणी प्रेक्षकांमधून करण्यात येत आहे.