कित्येक दिवसांपासून प्राईम टाईमच्या या गोंधळात आणि मालिकांच्या स्पर्धांमध्ये एका मालिकेने आपलं प्रेक्षकांच्या मनात असणारं स्थान कायम ठेवलं. ती मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मुंबईतील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवासी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, त्याच रोजच्या आयुष्यातून मिळणारी मोलाची शिकवण आणि अशा बऱ्याच गोष्टींवर प्रकाशझोत टाकत या मालिकेचं कथानक साकारण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.

अशा या मालिकेत ‘डॉ. हाथी’ची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली. बॉलिवूड कलाकार म्हणू नका किंवा मग सर्वसामान्य चाहते, प्रत्येकानेच आझाद यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. दरम्यान, त्यांचं निधन झालं असलं तरीही मालिकेच्या माध्यमातून ‘डॉ. हाथी’ मात्र यापुढेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या पात्राचं मालिकेच्या कथानकाच्या दृष्टीने असणारं महत्त्वं लक्षात घेता या पात्रासाठी आता नव्या चेहऱ्याची शोधाशोध सुरु असल्याचं कळत आहे. इतकच नव्हे, तर अभिनेता निर्मल सोनी ज्यांनी काही काळासाठी ‘डॉ. हाथी’ ही भूमिका साकारली होती, तेच पुन्हा एकदा या मालिकेत परतणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार सध्या ‘तारक मेहता…’चे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. दरम्यान एका व्हिडिओच्या माध्यमातून असितकुमार यांनी आझाद यांना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच मालिकेतील ‘डॉ. हाथी’ या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देता येणार नसल्यामुळेच आता एका नव्या अभिनेत्याला ही भूमिका साकारावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता ही भूमिका नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार आणि प्रेक्षकांच्या त्या अभिनेत्याला पसंती मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.