सध्या सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते ‘निंबोली’च्या आगमनाकडे. ‘बालिकावधू’ मालिका तब्बल दहा वर्षांनी पुढे जाणार आहे खरी..पण, काळाबरोबर मालिकेतील ‘आनंदी’ प्रौढ झाली आहे आणि मालिकेच्या कथानकाची अवस्था बालिश म्हणावी एवढी हास्यास्पद वाटते आहे. सात वर्षांपूर्वी ‘कलर्स’ वाहिनीवर मालिकेची सुरुवात आनंदीच्या बालविवाहापासून झाली होती. त्यानंतर बालविवाहाची प्रथा मोडून काढेपर्यंत मालिकेने पल्ला गाठला. खरे तर, बालविवाहाच्या प्रथेवर बोट ठेवणारी मालिका ही ‘बालिकावधू’ची पहिली ओळख होती. आज या मालिके चे स्वरूप काय आहे? याचा त्याच्या निर्मात्यांनीही विचार करायला हवा. प्रेमत्रिकोण, सासू-सुना असं दळण दळल्यानंतर आता तरी ही मालिका नव्याने झेप घेईल असं वाटत असतानाच आनंदीच्या मुलीला निंबोलीलाही बालविवाहात अडकवून कथानक पुन्हा सात वर्षांसाठी मागे गेलं आहे. मालिकांची ही वर्षांची उड्डाणे नेमकी कशासाठी? केवळ चांगल्या ‘टीआरपी’ असलेल्या मालिकांचा वाहिन्यांना असलेला आधार मोडून पडू नये म्हणून हा ‘वाढता वाढता वाढे..’चा खटाटोप सुरू असल्याचे दिसून येते.
सध्या काही र्वष पुढे नेत वाढवण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये ‘बालिकावधू’ ही एकमेव मालिका नाही. काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्लस’वरील ‘साथ निभाना साथिया’ मालिका दहा वर्षांनी पुढे ढकलण्यात आली. त्यामध्ये तुरुंगातून सुटून आलेल्या गोपीच्या खांद्यावर आपल्या कुटुंबाला एकत्र आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याच वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्येही लवकरच कथानक काही वर्षांनी पुढे जाणार आहे. विषेश म्हणजे वर उल्लेख केलेल्या मालिका संबंधित वाहिन्यांवर सर्वाधिक टीआरपी मिळविणाऱ्या मालिका आहेत. तरीही मालिकोंच्या कथानकामध्ये इतका मोठा बदल घडवून आणत त्या पुढे वाढवण्याचा धोका निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामागे मुख्य कारण आहे ते ‘टीआरपी’ची न संपणारी हाव. सध्या दिवसागणिक नवीन वाहिन्या, नव्या मालिका येत आहेत. स्पर्धेमध्ये प्रत्येकाला पहिल्या स्थानावर राहायचे आहे. त्यामुळे स्पर्धेत आपली खणखणीत वाजणारी नाणी घट्ट पकडून ठेवण्याची धडपड प्रत्येक वाहिनी करते आहे. ‘साथिया साथ निभाना’, ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘दिया और बाती’ या मालिकांमधील मूळ कथानक संपून कितीतरी वर्षांचा काळ लोटला आहे. त्यानंतर त्यात उपकथानकांचे फाटे फुटत गेले. खरं तर आत्तापर्यंत या मालिका बंद व्हायला हव्या होत्या. पण या तिन्ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या आत्तापर्यंत सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांच्या मालिका आहेत. त्यामुळे त्या पूर्णपणे बंद न करता, त्यातच काही ना काही नवं करून प्रेक्षकांवर थोपण्याचा सोपा मार्ग वाहिन्यांनी चोखाळला आहे.
२‘कलर्स’ वाहिनीचे तर हात दगडाखाली अडकले आहेत, असेच म्हणावे लागेल. ‘बालिकावधू’सारखी कौटुंबिक मालिका, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ अशा काही मोजक्याच मालिका आणि शोच्या नशिबावर वाहिनीचे गाडे लडखडत पुढे जात आहे. त्यामुळे या परिस्थितीत ‘बालिकालधू’सारखी आधारस्तंभ असलेली मालिका बंद करणे वाहिनीला परवडण्यासारखे नाही. २‘सोनी टीव्ही’ या स्पर्धेत कित्येक मैल मागे पडले आहे. मालिकांमधील यशाचा फॉम्र्यूला अजूनही वाहिनीला सापडला नाही. सध्यातरी ‘सीआयडी’ आणि रोनित रॉयवर वाहिनीची मदार अवलंबून आहे. लवकरच राम कपूर या वाहिनीवर नव्या मालिकेसह
परतणार आहे. त्याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. तरीही मालिका पुढे ढकलण्याचे हे सूत्र प्रत्येक वेळी वाहिनीच्या पथ्यावरच पडेल असे नाही. ‘मधुबाला’, ‘रंगरसिया’सारख्या मालिकांचे कथानकही काही र्वष पुढे ढकलल्यामुळे ‘कलर्स’चे हात आधीच पोळले आहेत. ‘झी टीव्ही’वरची ‘बंधन’ मालिकाही कथानक पुढे ढकलल्यावर स्पर्धेत मागे पडली आहे. ‘जोधा अकबर’मधील कथानक पाहता इतिहासाचा नव्याने अभ्यास करण्याची गरज लेखकाला असल्याचे दिसून येईल. त्यामुळे प्रस्थापित मालिकांच्या खोडावर वाहिनीचा वेलू उंचच उंच गगनी न्यायचा वाहिन्यांचा प्रयत्न पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी फारच तोकडा आहे..या सगळ्यात प्रेक्षकांच्या वाटय़ाला मात्र मनोरंजनाच्या नावाखाली फसवणूकच पदरात पडते आहे.