कास्टिंग काऊचच्या प्रकरणाला गेल्या काही दिवसांपासून बरीच चालना मिळाली आहे. अतिशय गांभीर्याने या मुद्द्यावर सेलिब्रिटी चर्चा करत असून, प्रत्येकजण याविषयी आपली भूमिका मांडत आहे. तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीने काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत सर्वांनाच धक्का दिला होता. स्थानिक कलाकारांना योग्य त्या संधी उपलब्ध करुन देत नसल्यामुळे तिने हे पाऊल उचललं होतं. त्यासोबतच तिने पुरुषांच्या मानसिकतेचा विरोध करत आपलं शोषण केलं जात असल्याचा आरोपही केला होता.

श्री रेड्डीच्या या कृत्यानंतर पोलिसांनी तिच्यावर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम २९४ (सार्वजनिक स्थळांवर अश्लील कृत्यं करणं) या अन्वये गुन्हा दाखल केला होता. तिच्या या कृत्यावर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने ट्विट करत ती एक राष्ट्रीय सेलिब्रिटीच झाल्याचं मत मांडलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे आपली मतं मांडणाऱ्या रामूने ट्विट करत लिहिलं, ‘श्री रेड्डी एक राष्ट्रीय सेलिब्रिटीच झाली आहे. मुंबईमध्ये तर जे लोक पवन कल्याण (दाक्षिणात्य सुपरस्टार)लाही ओळखत नाहीत तेसुद्धा आज श्री रेड्डीविषयी चर्चा करत आहेत.’ आता रामूच्या या ट्विटचं उत्तप श्री रेड्डी कसं देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, संपूर्ण कलाविश्वातच श्री रेड्डी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. तिच्या म्हणण्यानुसार मुव्ही आर्टीस्ट असोसिएशन (एमएमए)चं सदस्यत्वंही तिला नाकारण्यात आलं आहे.

कास्टिंग काऊचचा मुद्दा तेलुगू कलाविश्वात पहिल्यांदा पुढे आलेला नाही. याआधीही या अभिनेत्रीने हा मुद्दा पुढे आणत आपल्याला चेंबरचे सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी केली होती. अनेक प्रतिथयश निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर श्री रेड्डीने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.