या वर्षातील बहुचर्चित ठरलेले ‘मणिकर्णिका’ आणि ‘ठाकरे’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेले हे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहेत. यात ‘मणिकर्णिका’ने ‘ठाकरे’वर मात करत दुसऱ्या दिवशी तब्बल १८.१० कोटींची कमाई केली आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांना पायरसीची किड लागली असून हे दोन्ही चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत.

‘ठाकरे’ चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका वठविली आहे. तर ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’मध्ये कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता होती. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पायरेसी वेबसाईट ‘तामिळ रॉकर्स’ने हे दोन्ही चित्रपट लीक केले असून दोन्ही चित्रपट एचडी क्वॉलिटीचे असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘ठाकरे’ या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघू नये यासाठी शिवसेनेचे खासदार आणि चित्रपट निर्माते संजय राऊत यांनी विशेष खबरदारी घेतली होती. मात्र तरीदेखील हा चित्रपट लीक झाला आहे.

दरम्यान, ‘तामिळ रॉकर्स’ या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वेबसाईटवरून सर्वाधिक पायरसी होत आहे. गेल्यावर्षी ‘२.०’ च्या प्रदर्शनाच्यावेळी ‘तामिळ रॉकर्स’च्या जवळपास ३ हजार मायक्रोसाइट्सवर मद्रास हायकोर्टानं बंदी घातली होती.मात्र तरीदेखील हा चित्रपट लीक झाला होता. इतकंच नाही तर आतापर्यंत ‘उडता पंजाब’, ‘कबाली’, ‘काला’ ‘२.०’, ‘संजू’, ‘रेस ३’, ‘पद्मावत’, ‘झिरो’ सारख्या अनेक चित्रपटांना पायसरीचा मोठ्या फटका बसला आहे. या चित्रपटानंतर ‘मणिकर्णिका’ आणि ‘ठाकरे’देखील पायरसीच्या कचाट्यातून न सुटल्याचं दिसून येत आहे.