महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ठाकरे’ या बायोपिकच्या पार्श्वभूमीवर अभिनेता जॅकी श्रॉफने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. महाराष्ट्राचा आदर करण्यास बाळासाहेबांनी शिकवलं असं तो म्हणाला.

‘तुम्ही जिथे राहता, जिथे खाता-पिता, जिथे तुमचा जन्म झाला त्या ठिकाणाचे आदर केले पाहिजे हे मला बाळासाहेबांनी शिकवलं. ते मला माझ्या बाबांसारखे होते. त्यांनीसुद्धा मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवलं, मुलाप्रमाणे प्रेम दिलं. मला जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा त्यांची भेट घ्यायचो. वेळ मिळाला तर त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचो,’ असं त्याने सांगितलं.

बाळासाहेबांकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल तो पुढे म्हणाला, ‘एखाद्या गंभीर विषयालाही हास्यात रुपांतर करायचं अजब कौशल्य त्यांच्याकडे होतं. त्यांची बोलण्याची स्टाइल, लिहिण्याची स्टाइल अप्रतिम होती. मी फार काही बोलणार नाही. मी काम जास्त करतो आणि बोलतो कमी. हेसुद्धा त्यांनीच मला शिकवलं आहे. जास्त बोलायचं नाही काम करायचं, असं ते नेहमी म्हणायचे.’

Video : मुस्लीम असून ‘ठाकरे’तील भूमिका स्वीकारण्यावर नवाजुद्दीन म्हणतो..

‘ठाकरे’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारत आहे. अभिजीत पानसे दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.