बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘ठाकरे’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात शिवसैनिकांनी गर्दीही केली. प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. बाळासाहेबांचं समाजकारण आणि त्यानंतर त्यांचा राजकीय वावर याविषयी एकप्रकारे कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकेकाळी बाळासाहेबांचे वाघ समजले जात होते. मात्र या चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेखही करण्यात आला नाही.

शिवसेनेमध्ये महत्वाची पदे भूषवलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा यत्किंचितही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या साऱ्यांमध्येच याविषयी चर्चा रंगली आहे.

नारायण राणे, छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांचा शिवसेनेत एक दबदबा होता. मात्र काही कारणास्तव छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि या तिन्ही नेत्यांचा काही एक संबंध आला नाही. बाळासाहेबांनी या तिघांना आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. त्यामुळे या मुद्द्याची संजय राऊत यांनीदेखील दखल घेतली आणि या चित्रपटातून या दोघांचा उल्लेख सहजरित्या वगळला.

दरम्यान, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले स्वर्गीय आनंद दिघे, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशींना मात्र या सिनेमात चांगले स्थान देण्यात आले आहे. अनेक प्रसंगात ही मंडळी बाळासाहेब ठाकरे यांच्या अवतीभवती असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये बाळासाहेबांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून पंत अर्थात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मनोहर जोशी यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात संदीप खरेने मनोहर जोशी यांची भूमिका साकारली आहे.