शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलिज झाला तेव्हा त्यातल्या मराठी आवृत्तीतली एक गोष्ट अनेकांना खटकली. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेला सचिन खेडकर यांचा आवाज. मात्र आता हा आवाज बदलण्यात आला आहे. आवाजीतल बदलासह ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. बदललेल्या ट्रेलरमधला आवाज कुणाचा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र हा आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाइतकाच खणखणीत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीच हे संवाद म्हटले आहेत असे वाटते आहे. त्यामुळे या बदलांसह आलेल्या ट्रेलरलाही युट्युबवर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा बदललेल्या आवाजासह ट्रेलर 

‘उठाओ लुंगी बजाओ पुंगी’ सारखा संवाद असेल किंवा ‘८० टक्के मराठी मुलांनाच काम मिळालं पाहिजे’ या आणि अशा सगळ्या संवादांना हा आवाज अत्यंत चपखल बसला आहे. आता उत्सुकता आहे की हा आवाज कोणी दिला? हे जाणून घेण्याची. हा आवाज चेतन शशितल यांचा असू शकतो. मात्र याबाबत शिवसेनेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र आता नव्या आवाजातला ठाकरे सिनेमाचा ट्रेलर पाहणे ही पर्वणी ठरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खणखणीत आवाजात सिनेमा पाहणे ही देखील ट्रीट असणार आहे.

ठाकरे हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नवाजउद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताचा प्रवास या सिनेमातून पाहण्यास मिळणार आहे. सचिन खेडेकर यांच्या आवाजासह जेव्हा सिनेमाचा ट्रेलर आला होता तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत नवाजुद्दीन सिद्दीकीचाच आवाज आहे. तो अगदी चपखलही बसला आहे. मात्र मराठी ट्रेलरबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीनंतर जेव्हा संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली तेव्हा यासंदर्भात आमची बैठक झाली असून लवकरच काय तो निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले होते. आता बदललेल्या आवाजातच सिनेमाचा ट्रेलर युट्युबवर पाहायला मिळतो आहे.