‘ठाकरे’ हा सिनेमा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यावर अनेकांना खटकला तो सचिन खेडेकर यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तीरेखेला दिलेला आवाज अनेकांना पसंत पडला नाही. सचिन खेडेकरांचा आवाज बाळासाहेबांना नको अशी मागणी सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांद्वारे करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज हा भारदस्त होता. तशाच शैलीचा आवाज वापरला जावा अशी मागणी करण्यात आली. चेतन शशीतल यांचेही नाव पुढे आले. ज्यावर विचार विनिमय झाला आणि मग हा आवाज बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज  संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज बदलणार असल्याचं सांगितलं. सध्या तीन आवाजांच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी एक आवाज आम्ही ठाकरे सिनेमासाठी निवडणार आहोत असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

ठाकरे सिनेमा ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणे आज लाँच करण्यात आले. वांद्रे येथील ताज लँण्ड एण्ड्समध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, चित्रपटात शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता राव, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत व विधिता राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, वर्षा राऊत, वायकॉम 18 स्टुडिओजचे अजित अंधारे, निखिल साने, कार्निवल मोशन पिक्चर्स अध्यक्ष श्रीकांत भसी यांचीही उपस्थिती होती.