बॉलिवू़ड स्टार अक्षय कुमारने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवान जीतराम गुर्जरच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत केली आहे. अक्षयने हे डोनेशन ‘वीर’ ट्रस्टतर्फे दिले आहे. याआधीही त्याने वीर ट्रस्टला पाच कोटी रुपये दिले होते. सीआरपीएफच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल जगदीश नारायण मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी अक्षयचे आभार मानले आहेत. अक्षयने ट्विटरवरून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देशात संतापाची लाट उसळली आहे. कला, साहित्य, क्रिडा यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातुन या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. परंतु त्याचबरोबर अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयने शहिद जवानाच्या कुटुंबाला मदत केल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी अक्षयचे कौतुक केले. त्याचबरोबर शहीद जीतरामचे छोटे भाऊ विक्रम सिंह यांनीही अक्षयचे आभार मानले. अक्षय व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, विरेंद्र सेहवाग यांनीही मदत केली होती.

अक्षय कुमारने याआधीही पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत केली होती. अक्षयने ‘भारत के वीर’ या अ‍ॅपच्या माध्यमातून सात कोटी रुपयांचा मदतनिधी गोळा केला होता. त्यात स्वत:चे पाच कोटी रुपयांचे योगदान देउन तो निधी त्याने शहिद जवानांच्या कुटुंबियांकडे सुपुर्त केला होता.