छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा गुप्ता हिने आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी तिने ‘थप्पड’ फेम अभिनेता सिद्धांत कर्णिकशी लग्न केले होते. मात्र त्यांचा संसार जेमतेम वर्षभरच टिकला. अंतर्गत मतभेदांमुळे मेघाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

CID या मालिकेतून नावारुपास आलेली मेघा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सिद्धांतसोबत झालेले हे तिचे दुसरे लग्न होते. २०१६ साली तिने एका टीव्ही अभिनेत्यासोबत पहिले लग्न केले होते. मात्र वर्षभरातच तिने त्याला घटस्फोट दिला होता. सिद्धांतला डेट करत असल्यामुळे त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली, अशी चर्चा त्यावेळी होती. पुढे दोघांचे लग्न झाल्यावर ही चर्चा खरी ठरली. मात्र वर्षभरातच तिने सिद्धांतपासूनही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सिद्धांत कर्णिकणे अलिकडेच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाची माहिती दिली. “आमच्या दोघांमध्ये फार छान मैत्री आहे. मात्र आम्ही पती पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही. दोघांच्या विचारसरणीमध्ये फार फरक आहे. त्यामुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.” अशी प्रतिक्रिया सिद्धांतने या मुलाखतीत दिली.