|| स्वाती वेमूल

कानाखाली मारणे या शब्दाला आजवर कोणी इतक्या गंभीरतेने पाहिलं नसेल किंवा मुळात कानाखाली मारणं यात गांभीर्यच नाही अशा मताचीही अनेकजण आपल्या आजूबाजूला वावरत असतील. मग ते केवळ पुरुषच नाही तर स्त्रियासुद्धा, ज्यांनी आजवर ‘फक्त कानाखालीच मारली ना’ अशी मनाची समजूत घालून आपला, आपल्या मुलीचा, आपल्या सुनेचा, बहिणीचा, शेजारणीचा किंवा इतर कुठल्याही परक्या स्त्रीचा आत्मसन्मान पायदळी तुडवला, अशा लोकांसाठी बनवलेला हा सिनेमा… ‘थप्पड’. या नावातूनच चित्रपटाचा विषय समजतो. पण हा विषय केवळ एक घरगुती हिंसाचाराच्या नजरेतून न मांडता तो पूर्वापारपासून चालत आलेल्या मानसिकतेतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला आहे. तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

अमृता (तापसी) या गृहिणीच्या पात्राच्या माध्यमातून ही कथा मांडण्यात आली आहे. पण कथा फक्त तिच्या कुटुंबाशीच मर्यादित राहत नाही. तर तिची आई, सासू, मोलकरीण, होणारी नणंद, शेजारीण, वकील या सर्वांच्या आयुष्यात डोकावणारी ही कथा आहे. अमृताचं कुटुंब तसं पाहिलं तर सुखीच असतं. सासू आणि पती विक्रम यांच्यासोबत तिचा सुखाचा संसार सुरू असतो. अशातच एका पार्टीत ऑफिसमधल्या गोष्टीमुळे सहकाऱ्याशी झालेल्या भांडणादरम्यान ३० ते ४० पाहुण्यांसमोर, कुटुंबीयांसमोर अमृताला कानाखाली मारतो. त्या क्षणी पतीने कानाखाली मारल्याचा मानसिक धक्का तिला बसतोच, पण त्यानंतर त्या गोष्टीला विसरून पुढे जाण्याचा सल्ला देणाऱ्या प्रत्येकाकडून क्षणोक्षणी तिच्या मनावर आघात होत असतात. काही दिवस माहेरी राहायला आल्यावर नवरा पुन्हा तिला घरी घेऊन जायला येतो. पण त्यावेळीसुद्धा ‘पत्नीवर हात उगारण्याचं धाडसच कसं झालं’ या गोष्टीचा विचार न करता पुरुषी अहंकारात बुडालेला विक्रम अमृतावर राईचा पर्वत केल्याचा आरोप करतो. अमृताला सासरी परत येण्यासाठी कायदेशीर नोटीशही बजावतो. पण ती जाण्यास नकार देते. इथूनच सुरू होतो तिचा खरा लढा. ‘फक्त कानाखालीच मारली’ या गोष्टीवर कोर्टात तुला घटस्फोट नाही मिळू शकत असा दावा करणारी वकील, महिलांनी थोडंफार तर सहन केलंच पाहिजे असं म्हणणारी सासू आणि जे घडलं ते विसरून पतीसोबत राहायला जा असा आग्रह करणारी आई या सर्वांमध्ये अमृता तिचा आत्मसन्मान कसा राखते याबाबत हा चित्रपट सांगतो. गृहिणी अमृतासोबत तिची उच्चशिक्षित वकील, मोलकरीण, सासू, आई, नणंद यांच्याही भावभावनांना तो स्पर्शून जातो.

अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाची शैली म्हणजे कळीपासून फुलापर्यंत एखादी गोष्ट उत्तमरित्या फुलवत नेणे. ‘थप्पड’मध्येही हीच शैली अधोरेखित होते. सुरुवातीला भूमिकांची ओळख, हळूहळू कथेला सुरुवात आणि विचारात पाडणारा शेवट. उत्तम संवाद आणि त्यांचं टायमिंग यांचा सुरेख मेळ यात पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी संवाद नसतानाही केवळ कॅमेऱ्याची फ्रेम सर्वकाही सांगून जाते. ‘आर्टिकल १५’, ‘मुल्क’नंतर हा त्यांचा आणखी एक दमदार चित्रपट ठरतो. कथेच्या गरजेनुसारच एक-दोन गाण्यांचा समावेश यात केला गेलाय पण त्या गाण्यांचे बोलसुद्धा मनाला चटका लावून जातात.

‘पिंक’, ‘मुल्क’ या चित्रपटांमधील तापसीचं अभिनय पाहता अमृता या पात्रासाठी ती अत्यंत योग्य अशी अभिनेत्री ठरली. उगाचच आवाज न चढवता केवळ चेहऱ्याच्या हावभावाने उत्तम संवादफेक करणारी तापसी या चित्रपटातही मन जिंकून जाते. एक साधारण गृहिणी ते आपल्या आत्मसन्मानासाठी लढणारी स्त्री असा तिच्या भूमिकेचा प्रवास आहे या प्रवासाचा उत्तम सूर तिला गवसला आहे. कुमूद मिश्रा आणि रत्ना पाठक यांनी तिच्या आईवडिलांची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेत एक वेगळीच चमक दिसून येते. रत्ना पाठक, राम कपूर, पावैल गुलाटी, तन्वी आझमी, माया साराव यांनी त्यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत.

‘थप्पड’ या चित्रपटात फक्त एका पुरुषाने स्त्रिला कानाखाली मारल्याची कथा नाहीये, तर स्त्रियांच्याही मानसिकतेला चपराक लगावणारी आहे. आपल्या घरात, आजबाजूला अशा अनेक महिला असतील, ज्यांच्यासोबत घरगुती हिंसाचाराच्या घटना घडत असतील. या हिंसाचाराचा प्रकार जरी वेगवेगळा असला तरी थोड्याफार प्रमाणात तो घडतच असतो. पण असं घडण्याची वेळच येऊ नये असा विचारही न करता झालं गेलं ते विसरून आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी हा ‘थप्पड’ आहे.

या सिनेमाला लोकसत्ता ऑनलाइन कडून चार स्टार