१९४० ते १९६०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे राज कपूर. राज कपूर यांना शोमॅन म्हणून ओळखले जाते. आज त्यांची जयंती. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी राज कपूर यांचे संपूर्ण कुटुंब भारतात आले.

राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांना नाटकांची विशेष आवड होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलगा राज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक अध्यायच लिहिला होता. त्यांच्या ‘आग’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘आवारा’, ‘४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ या चित्रपटांनी तर त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळी जादू केली होती. राज कपूर यांनी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले होते. मात्र ‘४२०’ या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री साधना राज कपूर यांच्यावर चिडल्या असल्याचे म्हटले जाते.

‘420’ या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि अभिनेते राज कपूर यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर साधना राज कपूर यांचा तिरस्कार करत होत्या. साधना चित्रीकरणादरम्यान त्यांच्या हेअर स्टाईलवर जास्त लक्ष केंद्रीत करत असत आणि राज कपूर यांना ते आवडत नसे. एक दिवस अचानक राज कपूर यांनी साधना यांना अभिनय सोडून लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर साधना यांना राज कपूर यांचा राग आला आणि त्या चित्रीकरण सोडून घरी निघून गेल्या होत्या. परंतू त्यांचा अबोला फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी ‘दुल्हा- दुल्हन’ चित्रपटात एकत्र काम केले.