हॉलीवूड असो की बॉलीवूड कोणत्या चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, हीच चर्चा आज सर्वत्र ऐकायला मिळते. किंबहुना, चित्रपटांनी पटकावलेल्या पुरस्कारांपेक्षा त्यांची बॉक्स ऑफिस कमाई हेच सध्याच्या यशस्वी चित्रपटांचे परिमाण होत चालले आहे. त्यामुळेच की काय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कासव’, ‘विसर्जन’, ‘रिझव्र्हेशन’, ‘राँग साइड राजू’, ‘जोकर’, ‘खलिफा’ या सिनेमांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असतानाही व्यावसायिक यश मिळवता न आल्याने त्यांची गणना अयशस्वी चित्रपटांमध्ये केली जाते. इंटरनेटवर सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अशाच काही अयशस्वी चित्रपटांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेत ‘द थर्टीन्थ वॉरियर’ हा हॉलीवूडपट अग्रस्थानी आहे.

२७ ऑगस्ट १९९९ साली प्रदर्शित झालेला हा इतिहासातील सर्वात सुपरफ्लॉप सिनेमांपैकी एक म्हणून गणला जातो. १०३ मिनिटांचा हा अॅक्शनपट मायकल क्रायटन यांच्या ‘इटर्स ऑफ द डेड’ या कादंबरीवर आधारित आहे. उत्तम अॅनिमेशन, सिनेमॅटोग्राफी आणि अँटोनियो बँडॅरस, डायान व्हेनोरा, व्लादिमीर कुलिच, ओमार शरीफ यांसारख्या सुपरस्टार कलाकारांनी भरलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याकाळी तब्बल १६० दशलक्ष अमेरिकी डॉलर म्हणजे जवळ जवळ १०५० कोटी रुपये खर्च केले गेले होते.

प्रदर्शनापूर्वी वृत्तमाध्यमांतून ‘द थर्टीन्थ वॉरियर’च्या निर्मात्यांची फार स्तुती करण्यात आली होती. परंतु प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील जवळ जवळ सर्वच भागीदारांचे वाईट दिवस सुरू झाले. कारण त्यांना केवळ ६१ दशलक्ष अमेरिकी डॉलर महणजे जवळ जवळ फक्त ४५० कोटी इतकीच कमाई करता आली. परिणामी त्या काळत नफा मिळवणाऱ्या इतर चित्रपटांच्या तुलनेत यांची कमाई फार जास्त दिसत असली तरी देखील खर्चाच्या तुलनेत निर्मात्यांना १८५ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. परिणामी निर्मितीखर्चही भरून काढता न आल्यामुळे या चित्रपटावर सुपरफ्लॉप हा शिक्का मारण्यात आला.