अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. या व्यक्तीचं नाव जॉर्ज फ्लॉइड असं होतं. या ४८ वर्षीय व्यक्तीला दुकानदाराला खोटी नोट देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान जॉर्जला पकडण्यासाठी एका पोलीसाने त्याच्या मानेवर पाय ठेवला. मानेवर पडलेल्या दाबामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा थेट संबंध अमेरिकेतील वर्णव्देशाशी जोडला जात आहे. दरम्यान अॅकेडमी पुरस्कार संस्था, डिस्ने, वॉर्नर ब्रोस, नेटफ्लिक्स यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अमेरिकेतील वर्णव्देशाविरोधात आवाज उठवला आहे.

जॉर्ज फ्लॉइडच्या संशयास्पद मृत्यूमुळे कृष्णवर्णीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी थेट व्हाईट हाऊससमोर जाऊन निदर्शनं केली आहेत. या आंदोलनाला अॅकेडमीपासून अगदी नेटफ्लिक्सपर्यंत सर्व मोठ्या संस्थांनी, कंपन्यांनी, सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.

“आम्ही जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूचा निषेध करतो. आम्ही वर्णव्देशाच्या विरोधात आहोत. कृष्णवर्णीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. जॉर्ज फ्लॉईडला न्याय मिळायलाच हवा.” अशा आशयाचे ट्विट अॅकेडमी पुरस्कार संस्थेने केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वातावरण पेटलं आहे. लोक करोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच द्यायला सुरुवात केली आहे.