काही चित्रपट हे निव्वळ मनोरंजनासाठी असतात तर काहीत दडला असतो सामाजिक संदेश. काहीतून समाजाचं विदारक चित्र समोर येतं तर काही चित्रपट पाहताना आपला उर अभिमानानं भरून जातो. पण या सगळ्यांत काही चित्रपट असेही असतात जे ‘विशिष्ट हेतू’ ठेवूनच तयार केले जातात असाच काहीसा आहे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’. हा चित्रपट केवळ बायोपिक नाही तर काही ‘विशिष्ट हेतू’ ठेवूनच तयार केला आहे याची प्रचिती चित्रपट सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत येते.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट बेतला आहे तो माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या कांदबरीवर. याच नावानं काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कांदबरीनं नवनवे वाद ओढून घेतले. आता अशा वादग्रस्त कांदबरीवर आधारित चित्रपट येणार आणि तो वादात सापडणार नाही असं होणं दुर्मिळचं. त्यामुळे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ही अनेक कारणानं वादात सापडला. मनोरंजन विश्वात एक नियम आहे जे वादात सापडत त्याच्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल प्रेक्षकांमध्ये अधिक निर्माण होतं मात्र हे कुतूहल क्षमवताना कधी कधी भ्रमनिरासही होतो तसाच भ्रमनिरास ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पाहताना होतो.

या चित्रपटाची कथा फिरते ती अर्थातच मनमोहन सिंग, गांधी घराणं आणि युपीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर घडणारं राजकरण यावर. २००४ साली सत्ता हाती आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली आणि अत्यंत मितभाषी असणारे मनमोहन सिंग पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान झाले आणि इथूनच चित्रपटाची कहाणी पुढे सरकत जाते.

राजकारणाच्या पटलावरचे मोहरे, त्यांची राजनीती, सत्तेसाठी काहीही करणारे राजकारणी अशा मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे चित्रपटात आहेत. त्याचबरोबर गांधी घराणं आणि त्यांच्या वर्तुळातील अनेक निकटवर्तीयही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जसजसा चित्रपट पुढे सरकत जातो तसं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अहमद पटेल, सिताराम येचुरी, पृथ्वीराज चव्हाण असे राजकीय नेत्यांचंही दर्शन घडतं. हे सुरू असताना मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यातील अंतर्गत कलहही समोर येतो . पण, कुठेतरी या कलहाची सुरूवात कधी होते हे समजत नाही. हा कलह मांडताना सोनिया गांधी आणि एकंदरच गांधी घराणं खलनायकाची जागा घेतं. मात्र हे पडद्यावर पाहताना छुपा अजेंडा पेरलाय की काय असा विचारही चमकून जातो.

मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत असलेले अनुपम खेर, सोनिया गांधी यांच्या भूमिकेत असलेली सूझेन बर्नर्ट, संजय बारूच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना हे तिघंही आपापल्या भूमिकेत साजेसे आहेत. या तिघांची राजकीय व्यक्तीरेखा उभी करण्याची धडपड तितकीच कौतुकास्पद आहे. मात्र संपूर्ण चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर तटस्थपणे तो न मांडता त्याचं पारडं एका विशिष्ट बाजूला झुकलेलं वाटतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी निराशा होते.