भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका युथ काँग्रेससह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घेतली आहे. या वादावर खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र किरण खेर यांनी हा चित्रपट चक्क भारताकडून ऑस्करला पाठवला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

किरण खेर या अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजपाच्या खासदार आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चाकोरीबाहेरचा चित्रपट आहे. राहुल गांधीसारखे व्यक्ती जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करतात त्यांनी आपला विचार कृतीत उतरवून दाखवावा. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक मनमोहन सिंग यांच्या प्रेमात पडतील असंही त्या म्हणाल्या. इतकंच नाही भारताकडून हा चित्रपट ऑस्करला पाठवला पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे. हे पुस्तक पूर्वी अनेकवेळा वादातही सापडलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावी अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशारा युथ काँग्रेसनं दिला होता.