एकेकाळी ‘एशियन गेम्स’मध्ये सुवर्ण पदक पटकाविणारे पंजाबचे बॉक्सर कौर सिंग सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांना औषधांचे बिल देणेही शक्य होत नाहीये. त्यामुळे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने त्यांच्या या कठीण काळात मदतीचा हात पुढे केल्याचे वृत्त आहे.

वाचा : .. म्हणून विरुष्काने गुपचूप लग्न केले; सानिया मिर्झाचा खुलासा

१९८२ साली एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे बॉक्सर कौर सिंग सध्या हृदयासंबंधित विकारामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उपचारांसाठी त्यांना दोन लाख रुपये देणे आवश्यक होते. मात्र, त्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे शाहरुखला कळताच तो भावूक झाला आणि त्याने ‘कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) फाउंडेशन’तर्फे कौर यांना पाच लाख रुपयांची मदत केली.

याविषयी शाहरुख म्हणाला की, प्रत्येक खेळाडू हा आपल्या देशाचा अभिमान असून, त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. कौर सिंह यांच्याबद्दल कळताच आपल्याला त्यांची मदत करायला हवी असा विचार माझ्या मनात आला. प्रत्येकजण त्यांच्यापरिने मदतीचा हात पुढे करु शकतो. कौर यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो.

TOP 10 NEWS वाचा : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी, गॉसिप फक्त एका क्लिकवर

‘बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ (बीएफआय)नेसुद्धा कौर यांना एक लाख रुपयांची मदत केली आहे.