News Flash

लेखक अजूनही दुर्लक्षितच!

मराठी मालिका असोत, नाटक वा चित्रपट.. सगळीकडेच कथा काय आहे? यावर प्रेक्षकांचं पहिलं लक्ष असतं.

| September 7, 2015 07:01 am

लेखकांसाठी मानधनाचे प्रमाणित स्वरूप नाही..
मराठी चित्रपटांमध्ये ‘हिरो’ नसतात. मराठी चित्रपटांच्या कथाच ‘हिरो’ असतात, असं नेहमी सांगितलं जातं. मराठी मालिका असोत, नाटक वा चित्रपट.. सगळीकडेच कथा काय आहे? यावर प्रेक्षकांचं पहिलं लक्ष असतं. चांगली कथा असेल तर मराठी प्रेक्षक त्या कलाकृतीला दाद दिल्याशिवाय राहणार नाही, असा कौतुकाचा वर्षांव लेखकांवर सर्रास केला जातो. मात्र प्रत्यक्षात ज्या कथांवर या चित्रपटांचा, मालिकांचा, नाटकांचा डोलारा उभा राहतो ते या कथांचे कर्तेकरविते ‘लेखक’ नेहमीच दुर्लक्षित राहतात. श्रेयनामावलीत त्यांना स्थान मिळत असलं तरीही चित्रपट किंवा मालिकानिर्मितीच्या प्रक्रियेपासून प्रसिद्धीपर्यंत आणि योग्य ते ‘मान’धन मिळण्याच्या बाबतीत ‘मानाचि’चे लेखक अजूनही दुर्लक्षितच आहेत. नुकताच, ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष विजय पाटकर यांनी लेखकाचा चित्रपटाच्या पोस्टरवर उल्लेख असलाच पाहिजे, असा नियमच जारी करण्याचा निर्णय जाहीर करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयाच्या निमित्ताने लेखकांचे नेमके प्रश्न काय आहेत? याविषयी ‘मानाचि’ या नावाने मराठी मालिका, नाटय़ आणि चित्रपटसृष्टीतील संघटित झालेल्या लेखक मंडळींकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
चित्रपटसृष्टीत जे प्रस्थापित लेखक आहेत त्यांना फारशा अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. इतकी वर्षे या व्यवसायात राहून त्यांचे स्थान निर्माण झालेले असते, त्यांचे निर्मात्यांबरोबरचे असलेले संबंध, ओळखी यामुळे त्यांना आता काम मिळवणे अवघड राहिलेले नाही. आजही आपल्याकडे ओळखीवर आणि विश्वासावर काम करणारे निर्माते आहेत. ते संबंधित लेखकाची काम करण्याची पद्धत, त्याची कुवत यांविषयी जाणून असतात. त्यानुसार, त्यांच्यात परस्परसंमतीने मानधन ठरवले जाते. याचा कुठेही लिखित करार नसतो. मात्र याचाच गैरफायदा बऱ्याचदा नव्याने चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा मराठी चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या हिंदूी निर्मात्यांकडून घेतला जातो. हे टाळण्यासाठी मुळातच लेखकांना किती मानधन असावे, याचे प्रमाणित स्वरूप असले पाहिजे. त्याउपर, त्या त्या लेखकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेप्रमाणे त्याचे मानधन किती वाढेल हे अवलंबून असले पाहिजे, हा आमचा लेखक म्हणून आग्रह आहे.
मानधन कधी द्यायचे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्मात्यांकडे कथा दिल्यानंतर लेखकाला नव्वद दिवसांनंतर मानधन देण्याचा नियम आहे. कथा स्वीकारल्यानंतर चित्रपट किंवा मालिकेचे काम सुरू झालेले असते. मग लेखकांना नव्वद दिवस मानधनासाठी थांबवण्याचे कारण काय? एखाद्या मालिका-चित्रपटासाठी पाच-सहा महिन्यांआधी लेखकाने काम सुरू केलेले असते. त्यानंतर पुन्हा तीन महिने थांबायचे म्हणजे एका कामासाठीचे मानधन लेखकांना नऊ महिन्यांनंतर हातात पडते. मालिकांच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. काहीशे कोटींची मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री आहे. मात्र अजूनही आपल्याकडे लिखाणाचं तंत्र शिकवणारी एकही संस्था नाही. नाटकाच्या लेखकांची प्रक्रिया तर अधिक गुंतागुंतीची आहे. त्यांना पहिले नोंदणी करावी लागते. मग नवीन लेखकांना पहिल्या नाटकासाठी मिळेल ते मानधन स्वीकारावे लागते. यासाठी कुठे तरी लेखकांना मानधन किती दिले जावे, याची प्रमाणित पद्धत असली पाहिजे.
सचिन दरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 2:13 am

Web Title: the author still ignore
Next Stories
1 जेमतेम करमणूक
2 शैलीच्या धुक्यात हरवलेलं ‘सुसाट’
3 लेखकालाही प्रसिद्धी आणि पैसा मिळायला हवा
Just Now!
X