वीज गेली तर?, या वरवर साध्या वाटणाऱ्या एका छोटय़ा प्रश्नाचे उत्तर किती महाभयंकर असू शकेल, याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. वीज गेल्यावर घरात मेणबत्ती लावून वीज परत येण्याची वाट पहात बसणे एवढय़ापुरती त्याचे परिणाम मर्यादित नाही. आपल्या देशात तर भारनियमनाच्या समस्येवर अजूनही हमखास उत्तर सापडलेले नाही. पण ज्या विकसित देशांमध्ये तथाकथित विजेचा प्रश्न नाही अशा देशातही विकासाच्या नावाखाली तंत्रज्ञानाचे जे जाळे उभे राहिले आहे ते या एका वीज नसण्याने कोलमडून पडू शकते. अशावेळी आपण किती हवालदिल असतो आणि खरोखरच तसे झाले तर त्यावेळी काय उपाय केले पाहिजेत?, याची रंजक माहिती आणि चित्रण असणारा ‘द ब्लॅकआऊट’ नावाचा खास लघुपट आपल्याला पहायला मिळणार आहे.
‘नॅशनल जिओग्राफिक’ वाहिनी खास आपल्या प्रेक्षकांसाठी ‘रॉ टेलिव्हिजन’ कंपनीची निर्मिती असलेला ‘द ब्लॅकआऊट’ हा लघुपट प्रसारित करणार आहे. अमेरिके त झालेल्या सायबर हल्ल्यामुळे तेथील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्या दिवसांत तिथल्या अत्याधुनिक जनजीवनाचे कसे तीनतेरा उडाले?, याचे प्रत्यक्ष चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे. सगळे आर्थिक व्यवहार मोबाईल किंवा संगणकावर होत असल्याने आणि बिले भरण्यापासून-पैसे काढण्यापर्यंत बॅंकेत जाण्याची गरजच उरलेली नसल्याने पहिला घाला हा आर्थिक रसदीवर पडतो. कार्यालयीन कामे तर यंत्रा-तंत्राशिवाय अशक्य होऊन बसतात. एकूणच सगळे जनजीवन ठप्प होणे म्हणजे काय?, त्याचा अनुभव आपल्याला कधीही अशाप्रकारे वीजपुरवठा बंद झाला तर घ्यावा लागणार आहे. त्याची वास्तव जाणीव अत्याधुनिक जीवनशैली अंगवळणी पडलेल्या जगभरातील लोकांना व्हावी, यासाठी या लघुपटाची निर्मिती केल्याचे ‘रॉ टेलिव्हिजन’चे संचालक जोनाथन रूड यांनी म्हटले आहे. या लघुपटात नाटय़ नाही तर त्या दहा दिवसांत न्यूयॉर्क आणि सॅन दिएगोसारख्या मोठय़ा शहरांमधून काय झाले याचे जसे चित्रण आहे. त्याचप्रकारे असे झाले तर नेमके काय करायचे याविषयी आमच्या टीमने सायबर सुरक्षा, तत्काळ वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी आणि बॅंकिंग अशा विविध क्षेत्रातील जाणकारांना बोलते केले आहे, अशी माहितीही रूड यांनी दिली आहे.  शुक्रवारी, १५ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री नऊ वाजता हा लघुपट नॅशनल जिऑग्राफिक वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.