ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावरील ‘#MeToo’ मोहिमेअंतर्गत झालेल्या गंभीर आरोपांनंतर आता ‘द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आलोक नाथ यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी समितीने त्यांना असोसिएशनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘सिंटा’ने ट्विटरद्वारे दिली आहे.

मनोरंजन विश्वात ‘संस्कारी बाबुजी’ अशी ओळख असलेल्या आलोक नाथ यांच्यावर मनोरंजन विश्वातल्या अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुक, बलात्कारसारखे गंभीर आरोप केले. १९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. तसेच याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशांत यांनीदेखील आलोक नाथ यांच्या असभ्य वर्तनाचे पाढे वाचले होते. मनोरंजन विश्वात काम करणारी अभिनेत्री संध्या मृदुल हिनंदेखील आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

या संपूर्ण प्रकरणानंतर ‘सिंटा’नं आलोक नाथ यांना नोटीस बजावली होती. तसेच आलोक नाथ जर दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन ‘सिंटा’चे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी दिलं होतं. त्यानुसार आता आलोक नाथ यांना असोसिएशनमधून काढून टाकण्यात आलं आहे.