विविध मनोरंजन वाहिन्यांवर दैनंदिन मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांना आपल्याच वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी प्रत्येक वाहिनीने कंबर कसली आहे. या सगळ्यात मालिकांचा ‘टीआरपी’ टिकवणे आणि वाढवणे हा महत्त्वाचा भाग मानण्यात येतो. त्यासाठी मालिकेच्या कथानकात अचंबित करणाऱ्या घटना घडवणे, मालिकेतील एखादा प्रसंग, कथानकाचे वळण याची नक्कल करणे आदी खटाटोप केले जातात. इंग्रजी मालिका किंवा कार्यक्रमांची नक्कल हिंदी वाहिन्या आणि हिंदी वाहिन्यांची नक्कल मराठी मनोरंजन वाहिन्या करत असतात. एकमेकांच्या कल्पना, विषय चोरणे हे मनोरंजन वाहिन्यांवर सर्रास सुरू असते. एकमेकांवर कुरघोडी करताना प्रेक्षक पळविण्याचा किंवा वळविण्याचा एककलमी कार्यक्रमही या वाहिन्यांमध्ये सुरू असतो. मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.

‘झी मराठी’ आणि ‘कलर्स मराठी’ या दोन आघाडीच्या वाहिन्यांमध्ये सध्या अशीच स्पर्धा सुरू झाली आहे. एकमेकांचे प्रेक्षक पळवण्याच्या आणि कार्यक्रमांची नक्कल करण्याच्या या स्पर्धेत कोणता कार्यक्रम अधिक ‘टीआरपी’ मिळवितो याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून ‘सूर नवा ध्यास नवा’ या नव्या कार्यक्रमाच्या जाहिराती सुरू झाल्या. ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ने जाहीर केला आणि त्यापाठोपाठ लगबगीने ‘झी मराठी’ने आपल्या ‘सारेगमप’ची घोषणा केली. तर ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ दे’ हा कार्यक्रम तात्पुरता थांबवत आहोत, असे जाहीर झाले आणि पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ने ‘तुमच्यासाठी काय पण’ हा नवा कार्यक्रम सुरू करण्याचे जाहीर केले आणि गुरुवारपासून हा कार्यक्रम सुरूही झाला. ‘कलर्स मराठी’ने सोमवार ते बुधवार या दिवशी ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुरू केला. पाठोपाठ झी मराठीने सोमवार-मंगळवारी ‘सारेगमप’ सुरू केले. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने अमाप लोकप्रियता मिळविली. या  कार्यक्रमाच्या अल्पविरामाचा फायदा घेऊन कलर्स मराठीने सुरू केलेला ‘तुमच्यासाठी काय पण’ हा कार्यक्रम खरं तर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची नक्कल आहे. ‘तुमच्यासाठी काय पण’चा फायदा वाहिनीला किती व कसा होतो हे येणारा काळच ठरवेल. वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमधून जे गायक-गायिका आता ‘मान्यवर’ झाले आहेत, अशा मंडळींना घेऊन त्यांच्यात स्पर्धा घेण्याची ‘सूर नवा ध्यास नवा’ची संकल्पना वेगळी आहे. त्याच वेळी झी मराठीचा ‘सारेगमप’ कार्यक्रम सुरू झाला आहे. मराठीतील संगीताच्या रिअ‍ॅलिटी शोला झी मराठीने ‘सारेगमप’च्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पुढे मराठी मनोरंजन वाहिन्यांवर तशाच प्रकारचे कार्यक्रम सादर झाले. मराठीत अशा शोचा पाया दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीववरील ‘ताक धिना धिन’ या कार्यक्रमाने घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इतकेच कशाला खासगी मनोरंजन वाहिन्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्या प्रत्येक वाहिनीने मुंबई दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांचीच अगदी सेम टू सेम नक्कल केली होती.‘तुमच्यासाठी काय पण’ कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील चित्रपट, नाटक आणि मालिकांची प्रसिद्धी केली जाणार आहे. निर्माते, कलाकार, दिग्दर्शक यांना आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करणार असून यात योगेश शिरसाट, समीर चौगुले, अरुण कदम, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने, किशोर चौघुले या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाची एवढी रूपरेषाही त्याची तुलना ‘चला हवा येऊ द्या’शी करण्यास पुरेशी आहे. तिथेही एकटी श्रेया बुगडे आहे इथेही एकच स्त्री व्यक्तिरेखा म्हणून हेमांगी कवी आहे. कार्यक्रमात नावीन्यता आणण्यासाठी काहीवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला असल्याचा दावा वाहिनीकडून करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा सेट रेल्वे स्थानकाच्या स्वरूपात असून मनोरंजनाच्या या स्थानकावर कलाकार त्यांच्या कलाकृतीची प्रसिद्धी करणार आहेत त्याचे नाव ‘गाजावाजा स्टेशन’ असे ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन भागांत ‘दशक्रिया’ हा मराठी चित्रपट आणि ‘गेला उडत’ नाटकाचा चमू प्रेक्षकांना भेटणार आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

मनोरंजन वाहिन्यांमध्ये एकमेकांचे प्रेक्षक पळविणे, कथानक, प्रसंग, मालिकेतील वळण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांची नक्कल करणे हे प्रकार काही नवीन नाहीत. अगदी एकाच वाहिनीवरील मालिकांमधील कथानकाचे वळण, प्रसंग यांचीही थेट नक्कल केली गेलेली पाहायला मिळते आहे. ‘स्टार प्रवाह’ (मराठी) वाहिनीवरील ‘पुढचं पाऊ ल’ आणि  ‘देवयानी’ या मालिकांमध्ये ते दिसून आले. ‘पुढचं पाऊ ल’मधील भोंदूबाबा, गरोदर महिलेच्या झोपाळ्याची साखळी तुटणे, आक्कासाहेबांची दुहेरी भूमिका, आक्कासाहेबांचा आंधळेपणा या अत्यंत महत्त्वाच्या आणि  गाजलेल्या घटना पुढे काही महिन्यांनतर ‘देवयानी’ मालिकेत जशाच्या तशा प्रेक्षकांनी पाहिल्या. तीच गोष्ट सध्या ‘कलर्स मराठी’वरच्याच ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आणि ‘सरस्वती’च्या बाबतीत अनुभवायला मिळते आहे. दोन्ही मालिकेत मुख्य व्यक्तिरेखांचा मृत्यू किंवा अपघात आणि मग त्याजागी त्याच चेहऱ्याची दुसरी व्यक्तिरेखा आणून कथानक पुढे ढकलण्याचा प्रकार सध्या सुरू  आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांवर मालिकांचे विषय, आशय याचेही अनुकरण झालेले दिसून येते. एखाद्या वाहिनीवर पौराणिक किंवा ऐतिहासिक विषयावरील मालिका सुरू झाली की काही महिन्यांतच तशीच पण वेगळी पौराणिक किंवा ऐतिसासिक व्यक्तिरेखा असलेली मालिका अन्य वाहिन्यांवर सुरूकेली जाते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय मल्हार’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘संभाजी’ हे मराठीत तर हिंदूी मनोरंजन वाहिन्यांवर ‘झासी की रानी’, ‘महाराणा प्रताप’, ‘पेशवा बाजीराव’ ही काही वानगीदाखल उदाहरणे. एखाद्या वाहिनीवरील ‘पाककला’, ‘खाद्यपदार्थ’अशा विषयांवरील कार्यक्रमाला स्पर्धा म्हणून अन्य वाहिन्यांवरही तसाच कार्यक्रम सुरू केला जातो आणि विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमांचे वार आणि वेळही एकच असते. ‘मेजवानी परिपूर्ण किचन’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘हसा चकट फू’ हे अशा कार्यक्रमांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. वाहिन्यांवरील एकमेकांच्या कार्यक्रमांचे अनुकरण किंवा नक्कल करणे या आधीही होत होतेच. मात्र ते आडवळणाने केले जायचे. आता थेट प्रेक्षकांच्या लक्षात येईल अशा प्रकारे ही नक्कल केली जात आहे. त्यात कोणताही कमीपणा आहे असे आता कोणालाच वाटत नाही. मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात हे याआधीही होत होते आणि यापुढेही होत राहणार आहे. काहीही वेगळे करायचे म्हटले तरी ते पूर्वसुरींनी (आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन केंद्र) यांनी ते आधी केलेले असणारच आहे. काही अपवाद असतातही की तो कार्यक्रम त्या वाहिनीची संपूर्णपणे स्वत:ची संकल्पना असते. त्यात काही वेगळेपणा किंवा नावीन्य आणले जाते. पण असे अपवाद वगळता बरेचदा अनुकरणच केले जाते. अर्थात हे अनुकरण केले जात असले तरीही त्या त्या वाहिन्यांचे प्रमुख, मालिकांचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांची स्वत:ची सर्जनशीलताही काही वेळेस या अनुकरणातही दिसून येते आणि मग एखादी मालिका किंवा कार्यक्रमाची नक्कल कोणी केली तर त्यात कधी कधी नक्कल उजवी ठरते तर काही वेळेस तो प्रयोग फसतोही. मात्र असे असले तरीही मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील दैनंदिन मालिका आणि कार्यक्रमांना भरपूर प्रेक्षकवर्ग मिळतो आहे आणि प्रेक्षक दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहणे बंद करत नाहीत किंवा अन्य वेगळे काही त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपापले प्रेक्षक टिकवून ठेवण्यासाठी, अन्य वाहिन्यांचे प्रेक्षक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी नक्कल करण्याचा आणि प्रेक्षकांच्या पळवापळवीचा हा खेळ अव्याहतपणे सुरूच राहणार आहे हे नक्की.

‘अनुकरणाची मानसिकता नाही’

‘झी मराठी’ची सूत्रे स्वीकारल्यानंतर आम्ही आजवर कोणाचेही अनुकरण केलेले नाही. नव्या संकल्पनेवर आधारित जास्तीत जास्त कार्यक्रम किंवा मालिका कशा सादर करता येतील हाच आमचा प्रयत्न असतो. केलेली नक्कल प्रेक्षकांकडून स्वीकारली जात नाही. मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये आजही सर्वाधिक प्रेक्षक ‘झी मराठी’कडेच आहेत. त्यामुळे या प्रेक्षकांना नेहमीच नवीन काही तरी देण्याचा ‘झी मराठी’ प्रयत्न करते.

नीलेश मयेकर, झी मराठी- व्यवसायप्रमुख

 

‘आमची कोणाशीही स्पर्धा नाही

‘स्टार प्रवाह’ वाहिनीची अन्य कोणत्याही वाहिनीशी स्पर्धा नाही. आम्ही कुठे कमी पडतो, प्रेक्षकांना आणखी काय चांगले देता येईल याचा सातत्याने विचार आमची वाहिनी करीत असते. प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियाही विचारात घेतल्या जातात. प्रेक्षकांना काय आवडेल त्याचा विचार आम्ही करतो. वाहिनीचे सर्व संबंधित अधिकारीही एकत्र येऊन चर्चा करतात आणि कार्यक्रमांचे स्वरूप ठरविले जाते. मराठी मनोरंजन वाहिन्यांत आम्ही आता दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

 प्रवक्ता, स्टार प्रवाह (मराठी)