मुकुट हा काटेरी असतो असे म्हटले जाते. त्यामागचा अर्थ हा राजसत्ता बळकावण्याच्या तत्कालीन पद्धतीमध्ये असू शकतो. पण इंग्लडमध्ये एकीकडे संसदीय लोकशाही स्वीकारल्यानंतरदेखील राजघराण्याची परंपरा जोपासली जात असताना मुकुटाचा काटेरीपणा कदाचित कमी होऊ  शकतो. मात्र त्याच वेळी एक घुसमटदेखील सुरू होते. राजमहालाचा भव्यदिव्यपणा, त्यांच्या प्रथापरंपरांचे, राजशिष्टाचाराचे काटेकोर पालन आणि त्याच वेळी देशाच्या कायद्याने त्यांच्यावर आणलेली बंधने या साऱ्यातून जाताना नेमके काय होते, कौटुंबिक बाबी महत्त्वाच्या की मुकुटाची मानमर्यादा महत्त्वाची या कोंडीतून मार्ग काढणे कसे कठीण असते याचे अगदी मर्मग्राही चित्रण म्हणजे क्राऊन ही वेबसीरिज. राजकन्या एलिझाबेथ (द्वितीय) हिच्या लग्नापासून (१९४७) ते तिच्या राणीपदाच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी ही वेबसीरिज केवळ भव्य-दिव्याची मांडणी न करता त्याचबरोबर भव्यतेने, आणि शिष्टाचाराने घुसमटलेपणाची कथादेखील मांडते. क्रोऊनचे आजपर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. त्यातील पहिल्या सीझनबद्दल सध्या आपण बोलू या.

या वेब सीरिजची सुरुवातच होते ती राजकुमारी एलिझाबेथच्या लग्नाने. स्वाभाविकच त्या शाही सोहळ्याचे प्रभावी चित्रण करताना त्यातून सारे शाही प्रदर्शन आपसूकच होते. पुढे पाच वर्षांनी राजा जॉर्ज (सहावा) याच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार एलिझाबेथ राणी होते. पण त्याचबरोबर तिचं आयुष्यदेखील बदलून जातं. आता तिला जे काही करायचं ते फक्त राणी म्हणूनच, तिचे म्हणून स्वतंत्र अस्तित्व आता संपलेलं असतं. राणी म्हणून जे काही कायद्याने करायचं तेवढं आणि तेवढंच तिला करावं लागणार असतं. त्यात भावभावनांपेक्षा नियमांचे पालन हाच हेतू असतो. पण त्यातूनच एकेक पेचप्रसंग निर्माण होत जातात. अगदीच तरुण वयात राणीपदाचा मान आणि त्या पदाची कर्तव्यं निभावण्याची जबाबदारी, दुसरीकडे राजकारणात सारे काही आलबेल नसणे अशी परिस्थिती असते. चर्चिल पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले असतात. तरीदेखील एकूणच मंत्रिमंडळातील ढुढ्ढाचार्याच्या वर्चस्वामुळे नव्या रक्ताला वाव मिळावा अशी भावनादेखील पसरू लागते. त्यातच राणीच्या बहिणीला एका घटस्फोटिताशी लग्न करताना चर्चच्या आणि कायद्याच्यादेखील प्रतिगामी अशा प्रथांमुळे होणारे अडथळे, या साऱ्या गदारोळातील मुकुटाची वाटचाल ही काटेरी म्हणण्यापेक्षा घुसमटलेलीच होत जाते. अगदी शह-काटशहाचे राजकारण नसले तरी मुकुटाच्या राजशिष्टाचारात येणारे अडथळे, त्याचबरोबर राजकारणातले आणि समाजातील मतप्रवाह या साऱ्यांचा त्यावर प्रभाव पडत राहतो. चर्चिल यांच्या राजकारणातून निवृत्त होण्याच्या टप्प्यावर हा सीझन संपतो.

इंग्लडच्या राजघराण्यावर आजवर प्रचंड लिखाण झाले आहे, त्याची कसलीच माहिती नसेल अशांना ही माहिती या वेबसीरिजमुळे होतेच; पण अशी प्रचंड माहिती जगाकडे असताना त्या विषयावर प्रचंड खर्च करून भव्य-दिव्यतेत कसर ठेवता ही वेबसीरिज साकारली गेली आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल. एकतर कथेत उगाच पाणी घालणे शक्य नाही, पण त्याचबरोबर आजही असलेले राजघराण्याचे वलय पाहता वावदूकपणा देखील जमणारा नाही. पण तरीदेखील ही वेबसीरिज चित्तवेधक, रंजक अशी झाली आहे. त्याला काही अन्य कारणं आहेत. कथानकातील मोजके क्षण प्रभावी करणे हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल. त्याचबरोबर कॅमेऱ्याची कमाल. कथा तुम्हाला गुंगवत ठेवते आणि कॅमेरा तुम्हाला असंख्य कोनातून फिरवत राहतो.

एखाद्या सनसनाटी किंवा मसालेदार प्रकरणाप्रमाणे ही वेबसीरिज वेगवान नाही. काही काही वेळा ती टिपिकल राजशिष्टाचारासारखी वाटते. पण हे करतानाच प्रत्येक भागात दिग्दर्शकाने असे काही प्रसंग पेरले आहेत की एकूणच त्या परिस्थितीचे आकलन, तिची खोली, परिणामकारता कैक पटीने वाढते. राजा जॉर्जच्या मृत्यूच्या वेळी एलिझाबेथ दौऱ्यावर आफ्रिकेतल्या जंगलात असते. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख तर असतेच पण त्याच वेळी ती राणी झालेली असते आणि एका क्षणात तिच्याभोवतालची परिस्थिती बदलेली असते. एकीकडे वडिलांच्या मृत्यूचे दु:ख आणि दुसरीकडे राणीपणामुळे आलेला शिष्टाचार यातील तिचे हिंदकळणे त्या प्रसंगात स्पष्ट जाणवते. लंडनला आल्यावर अगदी तिची आजीदेखील तिला कमरेत वाकून अभिवादन करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असंख्य भावनांचे कल्लोळ जमा होतात. पहिल्या सीझनच्या दहा भागात असे प्रसंग वारंवार येतात. पदच्युत काका म्हणजे पूर्वीचा राजा एडवर्ड तिला भेटायला येतो तेव्हा तिचा संवाद हा तर तिच्या घुसमटीचा उत्तम नमुनाच आहे. विन्स्टन चर्चिलबरोबरच्या आठवडय़ाच्या आढावा बैठका, बहिणीच्या लग्नाचा विषय आल्यानंतर सुरुवातीची तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि नंतर कायद्याने बांधलेले हात, स्वत:च्या नवऱ्याचे नावच पुसून जात असल्यामुळे त्या दोहोंमध्ये निर्माण झालेली दरी, त्याच वेळी तिला आपल्या लौकिक शिक्षणातील उणीव जाणवल्याने तिने खास शिक्षक नेमण्याचा प्रसंग, तर दुसरीकडे पंतप्रधानपदावर राहायचे की जायचे यातून निर्माण झालेल्या कोंडीवर चर्चिल आणि त्यांची पत्नी यांचे संवाद असे अनेक प्रसंग एकूणच या वेबसीरिजची उंची वाढवतात. हे प्रसंग दरवेळी एका नव्या दिशेने कथेला घेऊ न जातात. चर्चिलच्या निवृत्तीनंतर राणीने दिलेल्या मेजवानी प्रसंगी तिच्या भाषणात तर दिग्दर्शकाने कमाल केली आहे. राणी आणि चर्चिलची बायको दोघींच्या मनात सुरू असणारी घुसमट त्या भाषणाच्या पाश्र्वभूमीवर पडद्यावर त्या दोघांच्या आयुष्यातील आदल्या दिवसाचा प्रसंग मांडून त्यातला विरोधाभास प्रकर्षांने जाणवून दिला आहे. ही सारी कमाल दिग्दर्शकाची.

दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भव्य-दिव्य पाश्र्वभूमी असेल तेव्हा केवळ महाकाय सेट वापरून किंवा व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करून नेत्रदीपकता आणता येते, पण त्या सर्वाचा वापर करताना जर तुमचा कॅमेरा केवळ त्या भव्य-दिव्यतेत अडकला तर ते केवळ ‘ग्लॅमरस’ या सदरात मोडते. पण येथे कॅमेरा इतक्या वेगवेगळ्या कोनातून फिरतो की त्याची कमाल पाहातच राहावी. कॅमेरा प्रेक्षकाला व्यवस्थित पकडून ठेवतो इतकंच नाही तर काही प्रसंग प्रेक्षकाच्या अंगावरच येतो. विशेषत: चर्चिल राणीला राजीनामा देऊ न बंकिगहम पॅलेसच्या बाहेर भावी पंतप्रधानाला भेटतात तेव्हा राजवाडय़ाची बॅकग्राऊंड तीन वेगवेगळ्या टप्प्यांत पकडत एकूणच त्या प्रसंगाची खोली प्रतिबिंबित होते.

एकूणच राजसत्ता चांगली की वाईट हा अनादी काळापर्यंत चर्चेत राहणारा विषय असला तरी, एका राजसत्तेच्या मुकुटाचा हा प्रवास पाहण्याजोगा आहे हे मात्र निश्चित.