आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेला जगातील पहिला अधिकृत सिनेमा म्हणून ‘कार्ने वाय एरिना’ या चित्रपटाला विशेष ऑस्कर पुरस्कार घोषित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक अलेहांद्रो गोन्झालेझ यांनी केले असून त्यांच्यामुळे चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञान आणखी एक पाऊल पुढे गेले आहे. सुपरस्टार दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यानेही आता अलेहांद्रो गोन्झालेझ यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपले पुढील चित्रपट आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवायचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्या तो आपल्या ‘बॅटमॅन द डार्क नाइट’, ‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ या काही आपल्या जुन्या चित्रपटांना अल्ट्रा एचडी या तंत्राने रूपांतरित करण्यात व्यग्र आहे.

अल्फ्रेड हिचकॉकला आदर्श मानणाऱ्या ख्रिस्तोफरचा अ‍ॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट आणि कॅमेरा ट्रिक्स यावर फार विश्वास आहे. त्यामुळे त्याचे सर्व सिनेमे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात. सध्या माध्यम क्षेत्रात एचडी व थ्रीडीएचडी या प्रकाराचे तंत्रज्ञान वापरले जाते आहे, परंतु ते आता मागे पडून त्याची जागा अल्ट्रा एचडी घेताना दिसेल त्यामुळे नोलानने आपले काही जुने चित्रपट या नवीन तंत्रज्ञानाने रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.

२००७ साली ‘अल्ट्रा एचडी’ किंवा ‘४ के’ तंत्रज्ञान बाजारात आले. पुढे २०१३ पासून जवळपास सर्वच महागडय़ा स्मार्टफोन्समध्ये ते सर्रास वापरले जाऊ लागले, परंतु कॅमेऱ्यातून टिपलेली चित्रफीत दाखवण्यासाठी टीव्हीच्या आकाराचे डिसप्लेच उपलब्ध नसल्यामुळे हा प्रयोग पूर्णपणे फसला. पुढे त्याची जागा थ्रीडी एचडी या प्रकाराने घेतली. सध्या मोठय़ा बजेटच्या सर्वच चित्रपटांची निर्मिती ‘४ के’ या प्रकारातच केली जात असली तरी ते चित्रपट पडद्यावर दाखवता येतील अशी सोय असलेली सिनेमागृहे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे नाइलाजाने निर्मात्यांना तो चित्रपट जुन्याच एचडी किंवा थ्रीडीएचडी या प्रकारातच प्रदर्शित करावा लागतो आहे. ‘४ के’ ही आभासी तंत्रज्ञानाची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. ख्रिस्तोफर नोलानला भविष्यात आभासी तंत्रज्ञानावरच आधारित चित्रपट तयार करण्याचे वेध लागले असल्याने त्याने त्याची पूर्वतयारी आणि अभ्यास म्हणून आपले जुनेच चित्रपट नवीन तंत्रज्ञानात रूपांतरित के ले आहेत.