हॉलिवूड अभिनेता पिअर्स ब्रॉस्नॅन गेल्यावर्षी पान मसालाच्या जाहिरातीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. हॉलिवूडमधला हा जेम्स बॉन्ड भारतात पान मसाल्याची जाहिरात करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता, विशेष म्हणजे आपण शरीरास हानिकारक पदार्थाची जाहिरात करतोय हे मला माहितीच नव्हतं असं म्हणत पिअर्सनं त्यावेळी या प्रकरणातून काढता पाय घेतला होता. पण आता दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागानं पिअर्स ब्रॉस्नॅनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दहा दिवसात उत्तर देण्याचे आदेश त्याला दिले आहेत.

दिल्ली सरकारच्या तंबाखू नियंत्रण कक्षाचं म्हणणं आहे की पान मसाल्याच्या आडून तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली जात आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण अधिनियमाप्रमाणे २००३ पासून तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जाहिरातबाजी करण्यावर बंदी आहे. पण वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेऊन देशभरातील अनेक दुकानांत पान मसाल्याची विक्री खुलेआमपणे सुरू आहे असं तंबाखू नियंत्रण कक्षाचे अतिरिक्त संचालक एसके अरोडा यांचं म्हणणं आहे त्यामुळे पिअर्स ब्रॉस्नॅनयांच्यावर सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण अधिनियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. पिअर्स यांनी पान मसाल्याची जाहिरात केली होती. यात सुपारीचा वापर केला जातो आणि सुपारीमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक आहेत असं एका अहवालातून समोर आलं आहे. पिअर्स हे जगभरातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत तेव्हा त्यांनी अशा पदार्थांची जाहिरात करणं हे चुकीचं आहे त्यामुळे पिअर्स यांना नोटीस बजवण्यात आली आहे. याआधीही पिअर्स यांना नोटीस बजावण्यात आली होती.

पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून पिअर्स यांच्यावर सोशल मीडियाद्वारे कडाडून टीका करण्यात आली होती. तेव्हा ही तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात असल्याची पूर्वकल्पना आपल्याला नव्हती असं एका मुलाखतीत स्पष्ट करत त्यांनी कंपनीशी करार रद्द केला होता.