आतापर्यंत अनेक कार्यक्रमांची निर्मिती महिलांवर आधारित किंवा महिलांसाठी झालेली आहे. मात्र कलर्स मराठीवर पहिल्यांदाच नवरे मंडळींसाठी  ‘नवरा असावा तर असा’ हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री हर्षदा खानविलकरने घेतली असून ती घराघरांमध्ये पोहोचून प्रत्येक गृहिणीचं तिच्या नवऱ्याविषयी मत जाणून घेत असते. मात्र रविवारी या कार्यक्रमाचा एक खास भाग रंगणार आहे.

कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्याही हर्षदाबरोबर मनमोकळेपणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. परंतु रविवारच्या भागामध्ये बिग बॉस मराठीतील दोन खास व्यक्ती हर्षदाबरोबर गप्पा मारणार असून बिग बॉसच्या घरातील त्यांचा अनुभवही शेअर करणार आहेत.

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची बरीच लोकप्रियता मिळवली. कार्यक्रमातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. याच कार्यक्रमामधील टॉप २ सदस्य म्हणजेच मेघा धाडे जी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली आणि पुष्कर जोग या कार्यक्रमामध्ये येणार आहेत.  विशेष म्हणजे या कार्यक्रमात हे दोघं एकटे येणार नसून त्यांच्या आयुष्यातल्या खऱ्या जोडीदाराला ते घेऊन येणार आहेत.

मेघा धाडे तिच्या नवऱ्यासोबत आणि पुष्कर जोग त्याच्या बायकोसोबत येणार आहे. या चौघांच्या येण्यामुळे हा भाग खास होई यात काही शंका नाही. तसंच त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नातं कसं आहे हे या कार्यक्रमातून उलगडणार आहे.  त्यामुळे येत्या रविवारी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता हा भाग नक्की पाहा.