X

अंतराळात उडल्यावर कॅन्सरशी लढणार सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडकरांचे रिमेकसाठीचे वेड काही केल्या कमी झालेले नाही

बॉलिवूडमध्ये जिथे बायोपिक सिनेमांची निर्मिती करण्याची लाट दिसते तशीच अजून एक लाट त्याच्या मागून येते ती म्हणजे रिमेकची. बॉलिवूडकरांचे रिमेकसाठीचे वेड काही केल्या कमी झालेले नाही असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून रिमेक गाणी आणि सिनेमांची संख्या सातत्याने वाढतेय. आता हेच पाहा ना.. ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक हिंदीमध्ये होत आहे. या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून सुशांत सिंग राजपूतच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

फॉक्स स्टार्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा करणार आहेत. दिग्दर्शक म्हणून मुकेश यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. आपल्या या सिनेमाबद्दल बोलताना मुकेश म्हणाले की, ‘सध्या सिनेमाच्या संहितेवर काम सुरू आहे. अभिनेता म्हणून सुशांतचे नाव निश्चित करण्यात आले असले तरी अभिनेत्रीसाठीचा आमचा शोध सुरू आहे. पुढच्या वर्षी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करु.’

जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित कथेवर जोश बून यांनी २०१४ मध्ये या हॉलिवूडपटाचे दिग्दर्शन केले होते. ही कथा एका कर्करोगग्रस्त मुलीची आहे जी आयुष्याच्या एका वळणावर सपोर्ट ग्रूपमधील एका मुलाला भेटते आणि त्याच्या प्रेमात पडते. हॉलिवूडमध्ये या सिनेमाची फार चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा बॉलिवूडमध्येही होते का ते काही दिवसांमध्ये कळेलच. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सुशांत सिंग राजपूतचे ‘काय पो छे’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आता तेच या सिनेमाचे दिग्दर्शनही करणार आहेत.

सुशांतच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच सुशांतने ‘केदारनाथ’ या सिनेमाचे पहिल्या शेड्युलचे चित्रीकरण संपवले. या सिनेमानंतर तो ‘चंदा मामा दूर के’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या सिनेमासाठी त्याने खास नासाला जाऊन अंतराळवीराचे प्रशिक्षण घेतले. नासाला जाऊन ट्रेनिंग घेणारा तो पहिलाच भारतीय अभिनेता ठरला आहे.

First Published on: October 6, 2017 8:12 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain