सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्यात ‘ग्रीन बुक’नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर जिंकून सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. तर ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ या चित्रपटानं सर्वाधिक चार पुरस्कार जिंकून ऑस्करवर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक नामांकनं मिळालेल्या ‘दी फेव्हरेट’ चित्रपटानंही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. या दोन्ही चित्रपटाचं भारताशी एक वेगळं नातं आहे.

‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ चा खरा नायक या फ्रेडी मर्क्युरी आणि ‘दी फेव्हरेट’ मधली प्रमुख नायिका ऑलिव्हिया कोलमन यांचं भारताशी जुनं नातं आहे. क्वीन बॅण्डमधील प्रमुख गायक फ्रेडी मर्क्युरी हा मुळचा भारतीय होय. भारतीय पारशी दाम्पत्याच्या पोटी फ्रेडी मक्युरीचा जन्म झाला. फ्रेडीचं खरं नाव फारूख बलसारा होय. पाचगणीतील बोर्डिग स्कूलमध्ये पौगंडावस्थेपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतरचं शिक्षण त्यानं मुंबईतही पूर्ण केलं. १९६३ साली भारत आणि भारतीयत्व त्याग केलेल्या या कलाकाराने आपल्या आई-वडिलांसोबत ब्रिटनमध्ये बस्तान बसविले. त्यानंतर हीथ्रो विमानतळावर चतुर्थ श्रेणीत फारुख बलसारा काम करू लागला. एक सर्वसामान्य कर्मचारी ते संगीताच्या दुनियेत राज्य करण्याची त्याची धडपड ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’मध्ये पाहायला मिळते.

तर दुसरीकडे ‘दी फेव्हरेट’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ऑस्कर पटकावणारी ऑलिव्हिया कोलमन हिचं देखील भारताशी एक अप्रत्यक्ष नातं आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हू डू यू थिंक यू आर’ या ब्रिटीश माहिटीपट मालिकेत कोलमन यांचं भारताशी असलेलं नातं सांगितलं होतं. या मालिकेत प्रत्येक कलाकारांचं तज्ज्ञाच्या मदतीनं मूळ शोधलं जातं. यावेळी कोलमन यांचे पूर्वज ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीसाठी कोलकाता आणि लंडनमध्ये काम करत असल्याचं समोर आलं. तर त्यांच्या एका पूर्वजाचा जन्म हा बिहारमध्येच झाला असल्याचंही या मालिकेत दाखवण्यात आलं होतं. यासाठी कोलमननं स्वत: भारतात भेटदेखील दिली होती.