सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांना परत आणण्यासाठी जे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत त्यांना अजूनही प्रेक्षकांसाठी झगडावे लागते आहे. मात्र भारतीय भाषेत डब होणारे हॉलीवूडपट आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकसंख्येची ही कोंडी सोडवली असल्याचे दिसून येते आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘मास्टर’ या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. करोना काळातही एवढी कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर राज्यातील चित्रपटगृह पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली. त्या वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यासाठी काही चित्रपटांचे पुन:प्रदर्शन करण्यात आले. तर ‘सूरज पे मंगल भारी’, ‘इंदू की जवानी’ हे हिंदी तर ‘टेनेट’, ‘वंडर वुमन १९८४’ हे हॉलीवूडपट असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन’ या दोन्ही चित्रपटांनी अंदाजे २० कोटी रुपयांची कमाई केली. सध्या चित्रपटगृह सुरू झाले असले तरीही प्रेक्षक बिग बजेट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंदीतील मोठे चित्रपट प्रदर्शित झाले नसले तरी दाक्षिणात्य अभिनेता विजयची प्रमुख भूमिका असलेला ‘मास्टर’ हा चित्रपट १३ जानेवारीला तर हिंदी भाषेतील डब चित्रपट १४ जानेवारीला देशभर प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी २५ कोटी तर दुसऱ्या दिवशी ५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती सिने वितरक अंकित चंदीरामानी यांनी दिली. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावरही ‘मास्टर’ या चित्रपटाच्या एक कोटी तिकिटांची विक्री झाल्याचे ‘बुक माय शो’चे प्रमुख आशीष सक्सेना यांनी सांगितले. करोनामुळे असलेल्या निर्बंधानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘मास्टर’ला ८० टक्के अधिक प्रेक्षकांनी पूर्वनोंदणी केली.

या चित्रपटाला चेन्नई बरोबरच बंगलोर, कोईंबतूर, मदुराई, त्रिची, हैदराबाद, सालेम, त्रिवेंद्रम, कोची, तिरूपूर आणि मुंबई या शहरांतही चांगला प्रेक्षकवर्ग लाभल्याचे सक्सेना यांनी स्पष्ट केले. ‘मास्टर’ चित्रपटाच्या यशामुळे निर्माते तसेच चित्रपटगृह मालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे करोना काळात ठप्प झालेल्या मनोरंजन सृष्टीला पुढे उभारी मिळेल, असे मत ‘पीव्हीआर सिनेमाज’चे कमल गियाचंदानी यांनी व्यक्त केले.