|| चित्र रंजन : रेश्मा राईकवार

मर्दानी २ :- नेमका विषय, वास्तवाच्या जवळ जाणारी मांडणी, नायिका पोलीस अधिकारी आहे आणि ती चित्रपटाची हिरो आहे, हे माहिती असूनही ती सर्वसामान्य पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणेच वागताना-बोलताना दिसते. तिची हुशारी, तिचा निर्भीडपणा हा तिच्या बोलण्यातून, वावरातून जाणवतो. त्यासाठी तिला उगाचच उंच उडय़ा मारत, वाऱ्याच्या वेगाने पळत गुन्हेगाराचा पाठलाग करावा लागत नाही. आणि अधिकारपदावर असली तरी ती स्त्री आहे त्यामुळे आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, तिच्याभोवती असणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता या सगळ्याचाही तिला सामना करावा लागतो. त्यामुळे ‘मर्दानी २’ हा चित्रपट अधिक रोखठोक आणि खरा वाटतो.

‘मर्दानी’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची कथा गोपी पुथरन यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शन प्रदीप सरकार यांचे होते, तर या वेळी गोपी पुथरन यांनीच लेखन केले आहे आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. दिग्दर्शनाच्या शैलीतला बदल हा या चित्रपटाच्या पथ्यावर पडला आहे. कु ठेही न भरकटणारी आटोपशीर कथा, कथेचा जीव आहे तेवढीच लांबी, कुठेही गाणी नाहीत किंवा शिवानीचे कुटुंब, तिच्याशी संबंधित भावनिक नाटय़ असा फापटपसारा यात नाही. मुंबईत पोलीस अधिकारी म्हणून मानवी तस्करीची केस यशस्वीपणे हाताळणारी शिवानी शिवाजी रॉय पुढच्या परीक्षा देत-देत आता कोटा शहराची पोलीस अधीक्षक म्हणून नव्या नियुक्तीवर दाखल झाली आहे. मुंबई ते कोटा या दोन शहरांमध्ये सामाजिक-सांस्कृतिक अंतरही तितकेच मोठे आहे. त्यामुळे कोटामध्ये केवळ गुन्हेगाराशी होणारा सामना नाही तर हाताखालचे अधिकारी एका स्त्री अधिकाऱ्याचे आदेश कसे पाळतील? इतक्या मूलभूत समस्येलाही तिला तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे बाहेरच्या शत्रूचा माग घेताना घरभेद्यांच्या कारवायांमुळेही ती वारंवार अडचणीत येते. शिवानीचा मूळचाच रोखठोक स्वभाव या वातावरणात तिचे अंतर्गत शत्रू वाढवणारा ठरतो. त्यात एका अशाच विचाराने बुरसटलेल्या माथेफिरू गुन्हेगाराशी तिची गाठ पडली आहे. सध्या देशभरात वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून सरकार, प्रशासन सगळ्यांच्या विरोधात लोकांचा सूर एकवटू लागला आहे. ‘मर्दानी २’मध्येही हाच विषय घेण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार, पाठोपाठ एका पत्रकाराची हत्या.. या सगळ्या कडय़ा जुळवत गुन्हेगाराचा माग काढण्यात गर्क असलेली शिवानी आणि एका क्षणी तिलाच खेळवण्याचा प्रयत्न करणारा माथेफिरू गुन्हेगार असा ससेमिरा यात पाहायला मिळतो.

‘मर्दानी २’ची कथा साधारण कोणत्या अंगाने जाणार, याची आपल्याला आधीच कल्पना येते. इथे शिवानीच चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे ती कधी ना कधी गुन्हेगाराला पकडणार, हा शेवट आपल्याला माहिती असतो. तरीही हा चित्रपट वेगळा ठरतो, कारण तो एकीकडे गुन्हेगाराची विकृत मानसिकता दर्शवतो. त्याचप्रमाणे कधी राजकारणी नेत्याच्या रूपात, तर कधी तिच्या हाताखाली असलेल्या शेखावतसारख्या पोलीस अधिकाऱ्यांची स्त्रियांविषयी असलेली मागास आणि संकुचित मानसिकताही तितक्याच प्रखरपणे जाणवून देतो. इथे स्त्री ही केवळ भोगवस्तू आहे म्हणून तिचा बलात्कार होत नाही, तर कुठलीही स्त्री पुरुषावर आवाज चढवूच शकत नाही, तिला तिची तथाकिथत समाजमान्य लायकी दाखवून देण्यासाठी गुन्हा घडतो. आणि गुन्हेगाराला पकडण्याऐवजी आपल्याच अधिकाऱ्याला मात देण्याचा खेळही याच मानसिकतेतून रंगतो. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत असलेली ही मानसिकता एका गुन्ह्य़ाकडून दुसऱ्या गुन्ह्य़ाचे धागे कसे विणत जाते आणि आपलीच व्यवस्था कशी हाणून पाडते, हेही दिग्दर्शकाने कथानकाच्या ओघात सहज जाणवून दिले आहे. कथानकाची वास्तवाच्या अंगाने जाणारी मांडणी ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. मुली शिकल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, आजच्या आधुनिक युगात यंत्रातंत्राच्या जोरावर आपण सुरक्षित आहोत, या विश्वासाचा पडदा मुळात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनीच टराटरा फाडून टाकला आहे. ‘मर्दानी २’मध्ये हीच जाणीव अधिक धारदार केली आहे, मात्र त्याच वेळी शिवानीसारख्या निडर महिला पोलीस अधिकाऱ्यांची व्यक्तिरेखा, त्यांच्या कथा या आजच्या काळात जास्त गरजेच्या आहेत हेही हा चित्रपट जाणवून देतो.

चित्रपटात राणी मुखर्जी वगळता बाकी सगळेच चेहरे नवीन आहेत. त्यामुळे चित्रपटभर राणीचाचा वावर हा प्रामुख्याने जाणवतो. इथे तिच्यासमोर उभ्या असलेल्या गुन्हेगाराची भूमिका विशाल जेठवा या नवोदित अभिनेत्याने साकारली आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याने खूप प्रभावी पद्धतीने आपल्या वाटय़ाला आलेली खलनायकी भूमिका रंगवली आहे. त्या तुलनेत इतर सगळ्याच भूमिकांना दुय्यम स्थान देण्यात आले असल्याने अभिनयाची जुगलबंदी फार दूरची गोष्ट झाली साधी देवाणघेवाणही फारशी नाही. एकहाती खेळ असल्यासारखा चित्रपट फक्त आणि फक्त शिवानी रॉयभोवती फिरत असल्याने त्यात वेगळेपणा फारसा जाणवत नाही. मात्र ही बाकीची कसर लेखक-दिग्दर्शक म्हणून गोपी पुथरन यांनी पटकथेच्या आणि नेमक्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून भरून काढली आहे. अशा प्रकारे हिरो रंगवताना अनेक ठिकाणी भावनिक नाटय़ रंगवण्याचा मोह होऊ शकतो. नाही म्हटले तरी इथे स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा अशा प्रकारच्या नाटय़निर्मितीला उद्युक्त करू शकला असता. मात्र संपूर्ण चित्रपटात एक संवाद वगळता कुठलीही भाषणबाजीही दिग्दर्शकाने केलेली नाही. त्यामुळे नायिकेप्रमाणेच विषय आणि मांडणीच्या बाबतीत रोखठोक असलेला ‘मर्दानी २’ प्रेक्षकांना थेट भिडतो.

दिग्दर्शक – गोपी पुथरन

कलाकार – राणी मुखर्जी, विशाल जेठवा, राजेश शर्मा, विक्रम सिंग चौहान, श्रुती बाप्ना.