बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही काळात ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’, ‘केसरी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यानंतर आता ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आणि प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटामुळे ४०० वर्षांपूर्वी शुर योद्धा तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला तो पराक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नेमके काय घडले होते कोंढाणा किल्ल्यावर?

सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा असे होते. हा किल्ला पहिल्यांदा आदिलशाहीकडे होता. तेथे दादोजी कोंडदेव हे सुभेदार होते. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिला. त्या गडावर उदयभान राठोड जो एक राजस्थानातील राजपूत होता. नंतर त्याने धर्मांतर केले, तो येथे मुघलांतर्फे कोंढाण्याचा सुभेदार होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड परत मिळवण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांची निवड केली होती. त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन मोहीमेवर जाण्याची तयारी दर्शवली. आश्चर्याची बाब म्हणजे तानाजी आपल्या मुलाचे लग्न लांबणीवर टाकून केवळ ५०० मावळ्यांसह कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले होते. त्यावेळी त्यांनी उच्चारलेले “आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं” हे वाक्य आजही इतिहासात दुमदुमत आहे. गडावर झालेल्या लढाईदरम्यान तान्हाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तिच लढाई पुढे त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी सुरु ठेवली आणि विजय संपादन करुन किल्ल्यावर भगवा फडकवला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याची व तान्हाजी यांच्या बलिदानाची माहिती समजली तेव्हा महाराज “गड आला पण सिंह गेला” असे उद्गारले होते. यानंतर या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले.