बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि दिवंगत राज कपूर यांची पाकिस्तानच्या पेशावर शहराच्या मध्यवती भागातील वडिलोपार्जित घरे खरेदी करून त्यांचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा सरकारने शनिवारी २.३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

दिलीप कुमार यांच्या घरासाठी ८०.५६ लाख रुपये, तर राज कपूर यांच्या घरासाठी दीड कोटी रुपये इतकी किंमत बांधकाम विभागाने निश्चित केली होती. या प्रस्तावाला औपचारिक मान्यता देऊन खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही घरे खरेदी करण्याची परवानगी दिली. खरेदीनंतर या प्रांताच्या पुरातत्व विभागातर्फे दोन्ही घरांचे संग्रहालयांत रूपांतर केले जाणार आहे. ‘कपूर हवेली’ नावाने ओळखले जाणारे राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर किस्सा ख्वानी बाजार भागात आहे. त्यांचे आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ ते १९२२ दरम्यान ते बांधले होते. राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म या इमारतीत झाला. प्रांतिक सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा स्थळ जाहीर केले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे १०० वर्षांहून जुने वडिलोपार्जित घरही याच वस्तीत आहे. ते मोडकळीस आले असून, तत्कालीन नवाझ शरीफ सरकारने २०१४ साली ते राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.