छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शो कडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शो आणखी रंजक करतात. नुकताच शोमध्ये अभिनेते अनु कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

‘करिअरच्या सुरुवातीला मला यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटासाठी मला चार हजार रुपये मिळणार होते. पण ज्या वेळी मी चेक घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला १० हजार रुपयांचा चेक दिला. मला वाटलं यश चोप्रा यांना माझे काम आवडले आणि त्यांनी मला बक्षिस म्हणून जास्त पैसे दिले. काही दिवसांनी मला कळाले की हा चेक मला चुकून देण्यात आला होता. हा चेक अनिल कपूर यांचा होता. दोघांचे अडणाव सारखे असल्यामुळे हा गोंधळ झाला होता’ असे अनु कपूर यांनी म्हटले.

अनु कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यांना कपिल शर्मा शोमध्ये पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. कपिल शर्मा शोमध्ये ते मजामस्ती करताना दिसत होते. तसेच कपिल देखील त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसला.