विनोदवीर कपिल शर्माच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. टीआरपी रेटिंगमध्ये ‘द कपिल शर्मा शो’ गटांगळ्याच खाताना दिसतोय. मागच्या महिन्यात शोमध्ये चंदन प्रभाकर परतला, भारती सिंगही कपिलच्या शोमध्ये सहभागी झाली. दोघांमुळे टीआरपी वाढून शो सहाव्या क्रमांकावर आला होता. मात्र मागील आठवड्याची टीआरपी पाहता कपिलसाठी निराशाजनक बातमी आहे. टीआरपीच्या टॉप १० च्या यादीतून कपिलचा शो बाहेर पडलाय.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टीआरपी यादीत हा शो चौदाव्या क्रमांकावर राहिलाय. मागील दोन आठवड्यांचे एपिसोड विशेष नसल्याने टीआरपी घसरल्याचे म्हटले जातेय. तर यामागे कपिल आजारी असल्याचेही कारण सांगितले जातेय.

वाचा : मुलीसाठी सनीची जोरदार शॉपिंग 

आजारी असल्यामुळे कपिल शर्माने दोनदा शोची शूटिंगही रद्द केली होती. शाहरूख खान ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये गेला असता सेटवर कपिल बेशुद्ध झाला आणि त्यामुळे ही शूटिंग रद्द करावी लागली होती. त्यानंतर ‘मुबारका’ चित्रपटाची टीम ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. चार तास कपिलची वाट बघूनही तो आला नाही, शेवटी त्यांनी तिथून निघणेच पसंत केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कपिलची तब्येत बिघडल्यामुळे तो सेटवर येऊ शकला नव्हता. त्यामुळे चार तास वाट पाहून ‘मुबारका’ची टीम रिकाम्या हातीच परतली.