13 December 2017

News Flash

‘मुंबईत राहून तुला अजून मराठी येत नाही…?’ शिबानीचा कपिलला सवाल

'नूर'च्या प्रमोशनसाठी सोनाक्षी आणि शिबानीने कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 4:43 PM

छाया सौजन्य-युट्यूब

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नुकतीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हजेरी लावली होती. ‘नूर’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोनाक्षीसोबतच शिबानी दांडेकरनेही कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या सीमारेषेपलीकडे उभी राहून धमाल निवेदन करणारी शिबानी कपिलच्या शोमध्ये चक्क अस्खलित मराठी बोलत होती. मुख्य म्हणजे आपल्या ठसकेबाज मराठी शैलीत शिबानीने कपिलला चांगलेच पेचात पाडले.

‘मला हिंदी बोलता येत नाही. तर मग या कार्यक्रमात मला का बोलावलं आहे?’ असा प्रश्न तिने कपिलच्या शोदरम्यान उपस्थित केला. नेहमी कलाकारांना उलटसुलट प्रश्न विचारुन त्यांना गुंतवून ठेवणाऱ्या कपिलला यावेळी शिबानीनेच ‘तुला मराठी येतं का?’ असा प्रश्न विचारत पेचात पाडलं. ‘मी इंग्लिश बोलते, मराठी बोलते.. पण तू तर हिंदी बोलतोस…आता काय करावं?’ असा प्रश्न शिबानीने कपिलला विचारला. ‘मुंबईत राहून तूला अजुन मराठी येत नाही..?’ असा उपरोधिक प्रश्न विचारत शिबानीने कपिलची खिल्ली उडवली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शिबानीच्या या विनोदी खेळीनंतर शांत राहील तो कपिल कसला. कपिलही काही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. त्यानेही… विनोदी खेळी करत ‘ही शिबानी दांडेकर आहे की शिबानी दंड-देकर… जी दंड देऊनच इथून जाणार आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. शिबानी आणि सोनाक्षीच्या उपस्थितीत कपिल शर्मा शोमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

(युट्यूबवर ‘द कपिल शर्मा शो’च्या या भागाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ३८व्या मिनिटांपासून शिबानीचा हा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या विविध टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये तिच्या ‘नूर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हजेरी लावत आहे. सुनील सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या मागे असणारे शुक्लकाष्ठ आता काहीसे कमी होत असून त्याचा कार्यक्रम पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळतेय.

First Published on April 21, 2017 4:43 pm

Web Title: the kapil sharma show sonakshi sinha and shibani dandekar to promote movie noor shibani talks in fluent marathi